‘आरटीओ’च्या कारवाईदरम्यान सोलापूरात एकाचा बळी

सोलापूर : मोहोळ – लांबोटी दरम्यान सोलापूरच्या दिशेने जाणा-या टॅंकरवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात एक दुचाकीचालक ठार झाला आहे. या घटनेमुळे मृताच्या संतप्त नातेवाईकांनी आरटीओ कर्मचा-यांना मारहाण करत सरकारी वाहनांची तोडफोड केली. 14 मार्च रोजी झालेल्या या घटनेप्रकरणी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचा-यांसह कंटेनर चालकाविरोधात मोहोळ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहन दत्तात्रय आदमाने असे मरण पावलेल्या शेतकरी मोटार सायकलचालकाचे नाव आहे.

कंटेनर थांबवण्यासाठी आरटीओ विभागाचे शासकीय चारचाकी वाहन (एमएच 04 केआर 6458) ओव्हरटेक करुन भर रस्त्यात आडवे लावण्यात आले. या प्रकारामुळे कंटेनर (एमएच 46 बीएम 2910) वरील चालकाला जोरात ब्रेक लावण्याची वेळ आली. कंटेनर चालकाने ब्रेक लावल्यामुळे मागून येणारी मोटार सायकल (एमएच 13 सीएक्स 1403) कंटेनरवर जोरात आदळली. या अपघातात मोटार सायकल चालक शेतकरी मोहन आदमाने यांचे जागीच निधन झाले. आरटीओ वाहनातील अधिकारी राजेश आहुजा, शिवाजी सोनटक्के, वाहनचालक शिवाजी किसन गायकवाड यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना संतप्त नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. आरटीओ वाहनासह कंटेनरचे नुकसान करण्यात आले. घटनेचे वृत्त समजताच मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर, स.पो.नि. राजकुमार डुणगे आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here