जळगाव : वयोवृद्धंना हेरुन त्यांच्याशी सलगी करुन त्यांच्या बोटातील अंगठ्या व रोख रक्कम लुटणा-या इब्राहिम उर्फ टिपू विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश विठ्ठल चाटे(73) रा. संत ज्ञानेश्वर चौक मेहरुण जळगाव यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
रमेश चाटे हे दि. 7 जानेवारी 2022 रोजी त्यांच्या नातेवाईकास 80 हजार रुपये उधार देण्यासाठी जात होते. वाटेत अशोक किराणा दुकानाजवळ त्यांना इब्राहीम उर्फ टिपू हा भेटला. बाबा कुठे जात आहात…..मी तुम्हाला सोडतो. पुढे पोलिस उभे असून चेकींग सुरु आहे. तुमच्याकडे जे असेल ते मला देवून टाका, मी तुम्हाला पुढे गेल्यावर देतो असे त्याने रमेश चाटे यांना सांगितले होते. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत चाटे यांनी हातातील एकुण 12 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व रोख 80 हजार रुपये काढून दिले होते. रोख रक्कम आणि सोन्याच्या दोन अंगठ्या हाती पडताच त्याने त्या बॅगेत ठेवल्या. त्यानंतर बाबा मी लगेच येतो असे म्हणत पलायन केले.
त्यानंतर टिपू परत येण्याच्या भाबड्या आशेवर वयोवृद्ध रमेश चाटे जागेवरच थांबले होते. मात्र टिपू काही आला नाही. या घटनेनंतर वयोवृद्धांसोबत गोड बोलून त्यांची लुट करणारा टिपू यास पोलिसांनी पकडल्याचे रमेश चाटे यांना आज समजले. त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून चौकशी केली व टिपू यास निरखून पाहीले असता ओळखले. त्याच्याकडून हस्तगत केलेल्या मुद्देमालात त्यांच्या सोन्याच्य्या दोन अंगठ्या देखील ओळखल्या. याप्रकरणी रमेश चाटे यांनी इब्राहिम उर्फ टिपू सत्तार मन्यार (30) रा. वराडसिम बाहेरपुरा ता. भुसावळ याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. या घटनेचा पुढील तपास पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील व त्यांचे सहकारी योगेश बारी करत आहेत.