बोदवडच्या मोटारसायकल चोरीचा गुन्हा अमळनेरला उघड

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत्या चो-या, घरफोड्या, पशुधन चोरीच्या घटना लक्षात घेत पोलिस अधिक्षकांनी गावागावात ग्राम संरक्षण पथक निर्मितीचे आदेश प्रभारी पोलिस अधिका-यांना दिले होते. त्या आदेशानुसार अमळनेर तालुक्यातील मंगरुळ, शिरुड, जानवे, कावपिंप्री, वाघोदा, रणाईचे, चोपडाई, कोंढावळ, चिमणपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक अशा बारा गावात ग्राम संरक्षण पथकाची निर्मीती करण्यात आली. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम अमळनेर येथे दिसून आला आहे. या पथकाच्या माध्यमातून बोदवड येथील मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला.

14 मार्च 2022 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास ग्राम सरंक्षक पथकातील चौघा तरुणांना इंदापिंप्री गावात जानवे रस्त्यावर तिन अनोळखी इसम मोटार सायकलने जातांना दिसले. पथकातील चौघा तरुणांनी त्यांची विचारपुस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे पथकातील चौघा तरुणांचा त्यांच्यावरील संशय बळावला. दरम्यान पथकातील एका तरुणाने मोटारसायकलवरील तिघा संशयितांचा फोटो आपल्या मोबाईलमधे काढून घेत लागलीच पोलिसांना फोन लावला. पोलिस येणार असे लक्षात येताच तिघांनी आपल्या ताब्यातील मोटार सायकल तेथेच सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले.

घटनास्थळावर सोडून गेलेल्या पल्सर मोटार सायकलचा तपास केला असता ती चोरीची असल्याचे उघडकीस आले. या मोटार सायकल चोरीचा गुन्हा बोदवड पोलिस स्टेशनला दाखल होता. मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी इंदापिंप्री गावात जाऊन चौघा तरुणांचा सत्कार केला. रात्र गस्त कशी करावी, संशयीतांची विचारपुस कशी करावी याबाबत त्यांनी सुचना व मार्गदर्शन देखील यावेळी केले.

उप विभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपुर्वी बारा गावांची बैठक अमळनेर पोलिस स्टेशनला बोलावण्यात आली होती. या बारा गावातील उपस्थित गावक-यांना यावेळी लाठी, शिटी व ओळखपत्र देण्यात आले होते. प्रत्येक गावात चार ग्राम रक्षक दररोज रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत गस्त घालण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले होते. आजुबाजुच्या चार गावांचा मिळून एक व्हाटसअ‍ॅप गृप यावेळी तयार करण्यात आला होता. त्यामाध्यमातून सर्व ग्रामरक्षकांना एकमेकांसोबत संवाद साधणे सोपे झाले. या व्हाटसअ‍ॅप गृपमधे सर्व संबंधित पोलिस अधिकारी, बिट अंमलदार, पोलिस पाटील, चालक व गावातील प्रतिष्ठीत नागरिकांचा समावेश आहे. पशुधन चो-या, इलेक्ट्रीक मोटारींच्या चो-या, ठिबक नळ्यांच्या चो-या, इतर अवजारे, मोटार सायकल चो-या आदी गैरप्रकारांना या माध्यमातून आळा बसण्यास मदत होत आहे. या बैठकीच्या वेळी अमळनेर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जयपाल हिरे, गोपनिय अंमलदार डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धार्थ सिसोदे, तालुक्यातील सर्व गावांचे पोलिस पाटील, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक, यांच्यासह जानवे जवखेडा बीटचे अधिकारी पोलिस उप निरीक्षक गंभीर शिंदे, अंमलदार कैलास शिंदे, हितेश चिंचोरे, जनार्दन पाटील, भुषण पाटील, योगेश महाजन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here