नाशिक : पोलिस चौकीतच मद्यप्राशन करतांना नागरिकांना आढळून आलेले आणि तक्रारदारालाच मारहाण केल्याचा आरोप शिरावर असणा-या चौघा पोलिस कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलिस स्टेशन अंतर्गत दादाजी कोंडदेव पोलिस चौकीत मध्यरात्री हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांचा रोष आणि सुरु झालेली व्हिडीओ शुटींग बघून पोलिसांनी घटनास्थळावरुन पलायन करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आ.सीमा हिरे यांनी पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर कारवाईला वेग आला.
टवाळखोर मद्यपींकडून वारंवार होणारा धिंगाणा आणि त्यांच्यावर कारवाईची तक्रार करण्यासाठी काही नागरिक गंगापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणा-या दादाजो कोंडदेव पोलीस चौकीत गेले होते. मद्यपींची तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकालाच पोलिस कर्मचारी मद्यप्राशन करतांना आढळून आले. “जो सावन आग बुझाये, ओ सावन आग लगाये” असा काहीसा अनुभव तक्रारदार नागरिकांना आल्यानंतर तक्रार कुणाकडे करावी आणि दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न पडला. तक्रारदारलाच पोलिस कर्मचा-यांकडून मारहाण झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमधे या घटनेची शुटींग सुरु करताच कर्मचा-यांनी धुम ठोकण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांना समजताच त्यांनी घटनस्थळावर धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.