जळगाव : संतापाच्या भरात शालकाने आपल्या मेहुण्याचा खून केल्याची घटना जामनेर पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. बहिणीला नांदवत नसल्याच्या रागातून शालकाने मेहुण्याचा खुन केल्याचे म्हटले जात आहे. तथापी खरे कारण अधिक तपासात पुढे येणार आहे. काल रात्री घडलेल्या घटनेची माहिती जामनेर पोलिसांना समजली होती. मात्र मुसळधार पावसामुळे घटनास्थळी कुणाला जाणे शक्य झाले नाही. आज भल्या पहाटे जामनेर पोलिसांचे पथक घटनास्थळ असलेल्या लहासर फाट्यानजीक वाडीकिल्ला घाटात गेले. या प्रकरणी हल्लेखोर शालकास पोलिसांनी काल रात्रीच ताब्यात घेतले आहे.
परमेश्वर प्रकाश पारधी असे खुन करणा-या आरोपीचे तर भागवत मोतीराम पारधी असे मयत मेहुण्याचे नाव आहे. आपल्या बहिणीला नांदवत नसल्याचा राग शालक परमेश्वर पारधी याच्या मनात होता असे म्हटले जात आहे. काल रात्री संशयीत आरोपी परमेश्वर हा स्वत:हून जामनेर पोलिस स्टेशनला हजर झाला होता. आपण आपल्या मेहुण्याचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
मात्र मुसळधार पावसामुळे पोलिस पथकाला घटनास्थळी जाणे शक्य झाले नव्हते. आज दि. 30 जून रोजी डीवायएसपी इश्वर कातकाडे, पो.नि. प्रताप इंगळे व इतर कर्मचारी वर्गाने घटनास्थळ गाठत कारवाईला सुरुवात केली. तीन वर्षापूर्वी भागवत व सुरेखाबाई यांचा विवाह झाला होता. पती पत्नी मध्ये किरकोळ वाद असल्याने पत्नी सुरेखाबाई माहेरीच रहात होती. त्यामुळे शालक परमेश्वर पारधी याच्या मनात मेहुणा भागवत बद्दल राग होता. त्यातून परमेश्वर याने भागवत याचा खून केला असल्याचे म्हटले जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.