उपजिल्हाधिकारी स्नेहा खंडाळीकर यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा

यवतमाळ : सहायक आयुक्त शरदकुमार खंडाळीकर यांचा दोन वर्षापुर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्युप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार उप जिल्हाधिकारी असलेल्या त्यांच्या पत्नी स्नेहा उबाळे उर्फ स्नेहा खंडाळीकर (37) रा. यवतमाळ यांच्यासह सात जणांविरुद्ध लोहारा पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप जिल्हाधिकारी स्नेहा उबाळे – खंडाळीकर यांच्यासह अभिषेक उबाळे (30) (मुंबई पोलिस), अशोक खोळंबे (56), मनीषा खोळंबे (54), अक्षय खोळंबे (30), रा. आपटे वाडी जि. ठाणे, कपिल सातपुते (33) वय ३३ आणि अंकिता सातपुते (33) रा. मुकुंदनगर उल्हास नगर ठाणे अशी गुन्हा दाखल झालेल्या सर्वांची नावे आहेत.

यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरातील रहिवासी असलेले सहायक आयुक्त शरद कुमार खंडाळीकर व त्यांची उप जिल्हाधिकारी पदावरील पत्नी स्नेहा खंडाळीकर यांच्यात गेल्या सन 2020 च्या कालावधीत कलह सुरु होता. प्रसुतीनंतर मुलीला घेऊन गेलेल्या स्नेहा खंडाळीकर नंतर पतीकडे परत आल्याच नाहीत. या तणावाखाली जीवन जगणारे सहायक आयुक्त शरदकुमार खंडाळीकर यांची तब्येत खालावत गेली. पत्नीकडून त्यांचा जाच सुरु असल्याचा आरोप आहे. दरम्यान 25 ऑगस्ट 2020 रोजी शरदकुमार खंडाळीकर यांचे निधन झाले.

शरदकुमार खंडाळीकर यांचे भाऊ सुरेंद्रकुमार खंडाळीकर (25) राजनगर नांदेड यांनी याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करत पोलिसात तकार केली होती. मयत शरदकुमार यांची पत्नी तथा तत्कालीन राळेगाव उप विभागीय अधिकारी स्नेहा खंडाळीकर यांच्यासह सात जणांविरुद्ध संगनमताने कट रचून शरदकुमार यांची हत्या केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला. लोहारा पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून पोलिस अधिक्षकांकडे कैफीयत मांडण्यात आली. मात्र तेथेही न्याय मिळाला नाही म्हणून जिल्हा न्यायदंडाधिका-यांकडे याचिका दाखल करण्यात आली. न्यायदंडाधिका-यांनी खटला थेट चालवण्याचा आदेश दिला. जिल्हा सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साली यांच्या न्यायालयात दाखल याचिकेच्या कामकाजात शरदकुमार यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती हत्या असल्याचे कथन करण्यात आले. त्यांच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचे देखील न्यायालयात कथन करण्यात आले. अपिलकर्त्यांचा युक्तिवाद श्रवण करत न्या. जी. जी. भन्साली यांनी या प्रकरणी पोलिसांनी तपास करुन गुन्हा नोंद करावा असा आदेश दिला. त्यानुसार लोहारा पोलिस स्टेशनला एकुण सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here