सोलापूर (करमाळा) : लूटमारीच्या विविध घटनांमधील टोळ्या उघडकीस आणण्याकामी सोलापूर पोलिसांना यश आले आहे. एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर तिन गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र यापेक्षा जास्त घटना असल्याचा पोलिसांना संशय आहे. रंगनाथ ज्ञानदेव जाधव (25), रा. भाळवणी असे पकडण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याला 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
दुस-या एका घटनेत सोमनाथ वाघमारे (रा. पोफळज) या एका पोर्टलच्या पत्रकारासह चार संशयितांची नावे उघड झाली आहेत. पोलिस तपासात मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ वाघमारे हा एक न्यूज पोर्टल चालवतो. मानवाधिकार संरक्षण समितीचा तालुकाध्यक्ष असल्याचे देखील त्याने पोलिसांना सांगितले आहे. जेऊर, पोफळज व खडकेवाडी येथील चोरी, मारहाण व लूटमारीच्या तीन घटनांची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. त्यांच्या तपासात संशयित रंगनाथ यास सुरुवातीला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या कबुलीत चार साथीदारांची नावे उघड झाली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. चंद्रकांत ढवळे, तौफिक काझी, अमोल जगताप यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.