औरंगाबाद : टीन एज अर्थात कुमार वयातच दोघींमधे सुरुवातीला मैत्री झाली. महाविद्यालयीन मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. दोघींमधे नंतर जोडीदाराचे नाते निर्माण झाले. दोघींनी सोबत चार भिंतीच्या आड काही विशीष्ट स्वरुपाची छायाचित्रे देखील काढली. दोघींमधील ते नाते फुलत आणि बहरत गेले. मात्र त्यातील एक मैत्रीण दुसरीवर काही दिवसांनी हुकुमत गाजवू लागली. त्यामुळे त्यांच्यातील नात्यात हळूहळू दुरावा निर्माण झाला. एकीला दुसरीसोबतचे ते नाते नकोसे झाले. तिने दुसरीला तसे स्पष्ट केले. मात्र हुकुमत गाजवणा-या दुसरीला तिच्या मैत्रीणीचा विभक्त होण्याचा निर्णय मान्य नव्हता. तिला ती हवीच होती. सोबत पळून जावून लग्न करण्याचा तिने हेका लावला होता. अन्यथा दोघींनी सोबत काढलेली ती छायाचित्रे व्हायरल करण्यासह आत्महत्येची तिला धमकी दिली.
अखेर दोघींचा वाद क्रांती चौक पोलिस स्टेशनपर्यंत गेला. पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे आणि पोलिस उप निरीक्षक सी.व्ही.ठुबे यांनी दोघींचे म्हणणे समजून घेत दोघींच्या परिवाराला बोलावून घेतले. दोघींपैकी एकीने समजुतदारीने घेतले. ‘मी आज तक्रार देत नाही, मात्र यापुढे भविष्यात त्रास झाला तर तक्रार देईन व कायदेशीर पर्याय स्वीकारेन,’ असे तिने लिहून दिले. तर दुसरीच्या भावाने ‘माझी बहीण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेकायदा कृत्य करणार नाही,’ असे हमीपत्र लिहून दिले. त्यानंतर दोघींना सोडून देण्यात आले. असा आगळावेगळा तक्रारीचा प्रकार क्रांती चौक पोलिस स्टेशनला आला. सदर वाद सोडवण्याकामी महिला पोलिस उप निरीक्षक सुवर्णा उमाप, अंमलदार लता जाधव, आशा गायकवाड, निर्मला निंभोरे, नेहा वायभट आणि गिरिजा आंधळे या महिला अधिकारी व कर्मचारी वर्गाने दोघींचे समुपदेशन करण्याकामी सहकार्य केले.