जळगाव : मित्राच्या लग्नात नाचत असतांना धक्का लागल्याने उद्भवलेल्या वादातून तरुणावर तिक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी उर्फ फौजी बालकिसन जाधव (24) आणि सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण (20) दोन्ही रा. प्रियंका किराणाजवळ रामेश्वर कॉलनी जळगाव अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत.
तुषार ईश्वर सोनवणे (18) याच्या मित्राचे लग्न होते. त्यामुळे तो त्याच्या मित्रांसमवेत रामेश्वर कॉलनी भागातील स्वामी समर्थ केंद्राजवळ नाचत होता. त्यावेळी सनी जाधव उर्फ फौजी हा देखील नाचत होता. नाचत असतांना सनी जाधव याचा धक्का तुषार यास लागला. धक्का लागल्यानंतर देखील सनी जाधव उर्फ फौजी हा तुषारसोबत वाद घालू लागला. यावेळी सनी याने त्याच्या हातातील कोणत्या तरी तिक्ष्ण हत्याराने तुषारवर हल्ला केला. या हल्ल्यात तुषारच्या हाताला आणि गळ्याला दुखापत झाली. दरम्यान सनी याचा मित्र सचिन उर्फ कोंडा तेथे आला. त्याने तुषारला धरुन ठेवले व सनी याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 22 मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर तुषार याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. उपचार सुरु असतांना त्याने दिलेल्या जवाबानुसार सनी जाधव आणि सचिन उर्फ कोंडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना आज अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघा आरोपींना पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील यांनी ताब्यात घेत अटक केली. आज त्यांना तपास अधिकारी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी न्या. ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगीचे आदेश दिले आहेत. सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. सनी फौजी याच्याविरुद्ध यापूर्वी देखील मारामारीचे सहा गुन्हे दाखल आहेत.