जळगाव : आई – बापाचा विरोध पत्करुन प्रेमविवाह करणा-या विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून पती, सासु व दोघा नणंदांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. प्रणाली राहुल खरात असे तक्रारदार विवाहितेचे नाव आहे.
प्रणाली खरात या विवाहितेचा राहुल खरात या तरुणासोबत 1 जून 2019 रोजी प्रेम विवाह झाला. विवाहानंतर ती वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथे सासरी एकत्र कुटूंबात राहण्यास गेली. लग्नानंतर तिला एकही अपत्य झाले नाही. काहीही कामधंदा न करता पतीने तिला दारु पिऊन शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार सुरु केला. सासु व दोघा नणंदापासून कौटूंबिक त्रास तिला सुरु झाला. रिक्षा घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणावे यासाठी तिच्यावर दडपण टाकण्यास सुरुवात झाली. पती व सासु यांच्याविरुद्ध तिने सन 2020 मधे वरणगाव पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. या सर्व प्रकारानंतर तिला जळगाव येथे तिच्या काकांच्या घरी सोडून देण्यात आले.
गेल्या दोन वर्षापासून ती तिच्या आई वडीलांकडे रहात असतांना तिला घेण्यासाठी सासरची मंडळी आली नाही. त्यामुळे हे प्रकरण महिला दक्षता समितीकडे गेले. अखेर तिने एमआयडीसी पोलिस स्टेशनला पती राहुल कृष्णा खरात, सासु मंगला कृष्णा खरात, नणंद वर्षा उल्हास तायडे आणि रेशमा कृष्णा खरात (सर्व रा. वरणगाव ऑर्डनन्स फॅक्ट्री) यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात रितसर कायदेशीर फिर्याद दाखल केली. पुढील तपास सुरु आहे.