अट्टल मोटर सायकल चोरटे अमळनेर पोलिसांच्या ताब्यात

On: March 25, 2022 5:54 PM

जळगाव : ग्राम सरंक्षक पथकाच्या मदतीने अट्टल मोटार सायकल चोरटे अमळनेर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. ग्राम सरंक्षक पथकाच्या रात्र गस्तीची अमळनेर पोलिस स्टेशनला चांगल्या प्रकारे मदत होत असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. चाळीसगाव तालुक्यातील जानवे येथील पोलिस पाटील विलास धोंडू पाटील तसेच ग्राम सरंक्षक पथकातील अमळनेर तालुक्यातील जानवे येथील सदस्य विलास बारकू भिल, भैय्या सुरेश भिल, प्रमोद नाना भिल व अनिल संतोष भिल असे सर्वजण 22 मार्च 2022 रोजी रात्र गस्तीवर होते. त्यावेळी दोन संशयीत दुकान फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने गस्तीवरील पोलिस उप निरीक्षक अनिल भुसारे यांना बोलावून त्यांच्या मदतीने दोघा संशयीतांना पोलिस स्टेशनला आणले. दोघा संशयीतांच्या ताब्यात एक होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल आणि लोखंडी सळई आढळून आली.

पो.नि. जयपाल हिरे यांनी वरील दोघा संशयीतांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे राजु विक्रम खांडेलकर (20) आणि दिपक रविद्र पाटील (22) दोघे रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव अशी सांगितली. आपल्या ताब्यातील मोटार सायकल त्यांनी कोणगाव पोलीस स्टेशन जि. भिवंडी (ठाणे शहर) हद्दीतून चोरी केल्याचे कबुल केले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोघे दुकान फोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात होते. तत्पुर्वी ते ग्राम संरक्षक पथकाच्या माध्यमातून अमळनेर पोलिसांच्या हाती लागले. सोबतच मोटार सायकल चोरीचे विविध गुन्हे उघडकीस आले व त्यांनी मोटार सायकली काढून दिल्या. याशिवाय रात्रीच्या वेळी दुकानफोडीचा प्रसंग देखील टळला.

दोघा गुन्हेगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पडघा (ठाणे ग्रामीण) पोलीस स्टेशनला दाखल दोन गुन्हे, कोणगाव पोलिस स्टेशनला दाखल एक गुन्हा, भुसावळ शहर पोलिस स्टेशनला दाखल एक गुन्हा, बोदवड पोलिस स्टेशनला दाखल एक गुन्हा असे विविध गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यातील मोटार सायकली त्यांनी काढून दिल्या आहेत. सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी पो.नि. जयपाल हिरे यांच्यासह पोलिस उप निरीक्षक अनिल भुसारे, पो.हे.कॉ. जर्नादन पाटील, पोलिस नाईक मिलींद भामरे, पो.ना. शरद पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, सुर्यकांत साळुंखे, कैलास शिंदे, सिध्दांत सिसोदे, पो.कॉ. निलेश मोरे यांनी सहभाग घेतला.

यापूर्वी देखील इंदापिंप्री ता अमळनेर येथील पोलीस पाटील भानुदास आनंदा पाटील व ग्रामसुरक्षा पथकातील सदस्य नंदलाल भागवत पाटील, अभिषेक महादू पाटील, सुनिल दशरथ पाटील, प्रमोद देविदास पाटील, सुनिल दशरथ पाटील यांची मोलाची कामगीरी झाली होती. त्यांनी रात्रगस्तीदरम्यान मोटर सायकलवरील तिघा तरुणांना अडवून त्यांची विचारपुस केली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या ताब्यातील मोटरसायकल जागीच सोडून पलायन केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment