जळगाव : कारागृहातून संचीत रजेवर तात्पुरत्या स्वरुपात बाहेर आल्याचा गैरफायदा घेत बारा वर्षापासून फरार झालेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मुक्तार तडवी (41) रा. पिंपळगांव हरेश्वर ह.मु. खडकदेवळा ता.पाचोरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुक्तार तडवी हा पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा गावात आल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्याला शिताफीने अटक करण्यात आली.
फरार आरोपी मुक्तार तडवी याच्याविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला सन 2005 साली गु.र.न. 157 नुसार भा.द.वि. 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सन 2006 मधे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुनोर कुतूब्बुद्दीन तडवी (रा. पिंपळगांव हरेश्वर ता. पाचोरा) याच्या पोटावर त्याने चाकूहल्ला करुन त्याला जीवे ठार केले होते. 29 जून 2010 रोजी त्याला चौदा दिवसांच्या संचीत रजेवर सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याने पुन्हा चौदा दिवसांची वाढीव संचीत रजा मिळवली होती. 22 ऑक्टोबर 2010 रोजी त्याने काराग़ृहात हजर होणे अपेक्षीत असतांना तो हजर न होता फरार झाला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पिंपळगाव पोलिस स्टेशनला भा.द.वि.224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, स.फौ. अशोक महाजन, पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, पोना विनोद पाटील, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ. ईश्वर पाटील, चालक पोना अशोक पाटील आदींच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेण्याकामी सहभाग घेतला.