खामगाव : सोन्याच्या शिक्क्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचा-याकडील तब्बल अकरा लाख रुपयांच्या ऐवजाची लुट करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या ऐवजात 5 लाख रुपयांची रोकड, 21 हजार रुपये किमतीची सोन्याची (7 ग्रॅम) अंगठी, 2 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन चेन, तिन एटीम कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, 1 हजार रुपये मुल्य असलेले घड्याळ, 10 हजाराचा मोबाईल, 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या एकुण 7 अंगठ्या, 60 हजार रुपयांचे सोन्याचे लॉकेट, 50 हजार रुपयांचे दोन मोबाइल, एमआय कंपनीचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाइल, ‘विवो’ कंपनीचा 15 हजाराचा मोबाइल, ‘जीओ’ कंपनीचा 2 हजाराचा यासह एक रिव्हाल्व्हर अशा एकुण 11 लाख 66 हजार 350 रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. 25 मार्च रोजी दुपारच्या वेळी निरोड फाट्यानजीक घडलेल्या या घटनेप्रकरणी हिवरखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेतील एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले असून खळबळ माजली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथील सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी राजेंद्र चंदुलाल जाधव (59) असे लुट झालेल्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील अनिल छन्नु भोसले, अभीसेन तोन भोसले, दीपक भीमदास चव्हाण, दिनकर चलबाबू भोसले यांच्यासह इतर आठ जणांनी राजेंद्र जाधव यांना सोन्याची नाणी विकण्याच्या उद्देशाने षडयंत्र रचून बोलावून घेतले होते. सोन्याच्या नाण्यांच्या आमिषाला भुलून 25 मार्च रोजी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी राजेंद्र जाधव त्यांच्या साथीदारांसह निर्जन स्थळी पोहोचले. निर्जन स्थळी पोहोचल्यानंतर त्यांची लुट करण्यात आली. या घटनेप्रकरणी एकुण 12 संशयीत आरोपींविरुद्ध हिवरखेड पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास स.पो.नि. पी.आर.इंगळे करत आहेत.