बळजबरीने विष पाजलेल्या तरुणाचा मृत्यू

यवतमाळ : जुन्या वादाच्या रागातून तरुणाला बळजबरी विष पाजल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. 22 मार्च रोजी सदर घटना घडली असून 25 मार्च रोजी उपचारादरम्यान अंकुश विजय जाधव ((28) रा. घाटाणा ता.जि. यवतमाळ या तरुणाचे निधन झाले. या घटनेप्रकरणी वडगाव जंगल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. संजय दासू चव्हाण (50), चेतन संजय चव्हाण (25), चिरंजीव संजय चव्हाण (20), रोशन मनोज चव्हाण (22) आणि करण मनोज चव्हाण (20) सर्व रा. लोणी ता. जि. यवतमाळ अशी अटकेतील पाचही संशयीतांची नावे आहेत.

घाटाणा येथील रहिवासी असलेल्या अंकुश जाधव या तरुणासोबत लोणी येथील तरुणांचा जुना वाद सुरु होता. या वादातून 22 मार्चच्या मध्यरात्री लोणी येथील संजय चव्हाण, चेतन चव्हाण, चिरंजीव चव्हाण, रोशन चव्हाण आणि करण चव्हाण आदींनी संगनमताने अंकुशचे हातपाय पकडून त्याला बळजबरी विष पिण्यास भाग पाडले. या घटनेची माहिती समजल्यानंतर त्याच्या परिवारातील सदस्यांसह गावक-यांनी त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वडगाव जंगल पोलिस स्टेशनला याप्रकरणी सुरुवातीला अंकुश जाधव याचे वडील विजय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भा.द.वि. 143, 147, 149, 307 कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. उपचारादरम्यान निधन झाल्यानंतर त्यात 302 हे कलम वाढवण्यात आले. न्यायालयाने अटकेतील पाचही जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. वडगाव जंगल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवन राठोड यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक भास्कर दरणे, धनंजय शेकदार, गणेश आगे, निलकमल भोसले, अक्षय डोंगरे, मांगीलाल चव्हाण आदी पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here