आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात एक आगळावेगळा प्रकार उघड झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान दारु मिळाली नाही म्हणून अनेकांनी चक्क सॅनिटायझरचे प्राशन केले. त्यामुळे आतापावेतो 9 जणांचा मृत्यू झाला आहे. 20 पेक्षा अधिक लोकांनी सॅनिटायझर प्राशन केल्याचे म्ह्टले जात आहे. या घटनेने आंध्र प्रदेशात खळबळ माजली आहे.
कुरीचेड परिसरातील या घटनेत सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झालेले लोक 25 ते 65 वयोगटातील आहेत. हे सर्व लोक दारुच्या आहारी गेले होते. दारु मिळाले नाही म्हणून ते बेचैन झाले होते. त्यामुळे त्यांनी सॅनिटायझर प्राशन केले.
स्थानिक दुकानांमधून सॅनिटायझरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. ते सॅनीटायझर तपासकामी जप्त करण्यात आले असून त्याचे नमुने लॅबमध्ये पाठवले आहेत. मृतांमध्ये 3 भिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. केवळ सॅनिटायझर प्राशन केल्यानेच या लोकांचा मृत्यू ओढवला आहे की यात अजून काही केमिकल मिसळण्यात आले होते याचा देखील तपास करण्यात येणार आहे.
आंध्र प्रदेश सरकारने दारुच्या किमतीत वाढ केली, आणि दुकानांची संख्या कमी केली. असे असले तरीदेखील दारु पिणा-यांची संख्या कमी झाली नाही.