ठाणे : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षासाठी हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीका करत आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी वसई-विरार मनपात आंदोलन केले होते. त्यानंतर ठाणे मनपासमोर आंदोलन करताना पोलिसांनी त्यांना हद्दपारीची नोटीस बजावली आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मुलांसाठी ठाणे मनपासमोर आंदोलन करताना त्यांना हद्दपारीची नोटीस प्राप्त झाली आहे. या नोटिसमधे नमुद केल्यानुसार त्यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या पाच जिल्ह्यातून हद्दपार होण्यास सांगण्यात आले आहे.
नोटीस बजावल्यानंतर अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्सचे काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेचे ठाणे मनपासमोर आंदोलन सुरु होते. हे आंदोलन सुरु असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. येत्या ४ ऑगस्टपावेतो विरारच्या उपविभागीय अधिकारी रेणुका बागडे यांना स्पष्टीकरण देण्याची मुदत अविनाश जाधव यांना देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे मनपा हद्दीतील खासगी लॅबने रुग्णाला चुकीचा रिपोर्ट दिल्यानंतर अविनाश जाधव यांनी ठाणे मनपा प्रशासनाला धारेवर धरले होते.