धुळे : हाणामारीच्या फुटेज तपासणी दरम्यान शिक्षकाकडून विद्यार्थिनीच्या विनयभंगाचे फुटेज समोर आल्याने खळबळ माजली आहे. कौतिक चव्हाण असे धुळे तालुक्यातील म्हसदी येथील गंगामाता कन्या विद्यालयातील शिक्षकाचे नाव आहे. दहावीच्या विद्यार्थिनीसोबत सुरु असलेले हे दुष्कृत्य सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून उघड झाले आहे. म्हसदी येथील या शाळेचे लिपिक विजय भिलाजी अहिरे (28) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
शिक्षक कौतिक चव्हाण हे इंग्रजी विषय शिकवतात. वाढीव गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवत धाकदपटशा वापरुन त्यांनी हा प्रकार केल्याचा शैक्षणीक क्षेत्रातील लोकांमधे संशय आहे. हा गंभीर प्रकार उघड झाला असला तरी पिडीत विद्यार्थीनीच्या पालकांनी भितीपोटी पोलिसात तक्रार दिली नाही. शाळेच्या मुख्याध्यापिकेसह तिच्या पतीवर हे प्रकरण दडपण्याचा आरोप केला जात आहे.
शाळेचे लिपिक विजय अहिरे यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोगाकडे 2 मार्च 2022 रोजी ऑनलाइन तक्रार दिली होती. आयोगाने या ऑनलाइन तक्रारीची दखल घेतल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. लिपीक अहिरे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात योग्य ते पुरावे सादर केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शिक्षक कौतिक चव्हाण, मुख्याध्यापिका वर्षा देवरे व त्यांचे पती नरेंद्र देवरे यांच्याविरुद्ध साक्री पोलिस स्टेशनला 114/22 या क्रमांकाने रितसर गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. या शाळेच्या परिसरात एका महिलेला मारहाण झाली होती. या मारहाणीचे फुटेज तपासले जात असतांना हा विनयभंगाचा प्रकार उघड झाला. शाळेतील एका खोलीत शिक्षक चव्हाण हे विद्यार्थीनीसोबत अंगलट करत असतांना दिसून आले आहे.