जळगाव : गुढीपाडव्याच्या दिवशी भुसावळ शहरातील गुरुद्वारापासून जळगाव नाक्यापर्यंत बारा बैलगाड्या ओढण्याची प्रथा आहे. कोरोना काळातील दोन वर्षाचा अपवाद वगळता नेहमीप्रमाणे यावर्षीदेखील गुढीपाडव्याच्या दिवशी भुसावळ शहरात मरीमाता यात्रोत्सवानिमीत्त बारागाड्या ओढण्यात आल्या. दोन वर्षाच्या खंडानंतर बारागाड्या ओढण्याच्या वेळी प्रचंड उत्साह आणि गर्दी दिसून आली. मात्र या गाड्या ओढतांना गर्दी अनियंत्रीत झाल्याने एक ठार व चौघे जखमी झाल्याची दुर्घटना घडली. यात एका भाविकाच्या अंगावरुन गाड्यांची चाके गेल्याने त्याचा जागीच मृत्यु तर लोटणारे चौघे जबर जखमी झाले आहेत.
यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले गिरीश रमेश कोल्हे (42), रा.सुतार गल्ली, जळगाव रोड, भुसावळ असे मृत्युमुखी पडलेल्या भाविकाचे तर बारागाड्या लोटणारे छोटू उत्तम इंगळे (33), रा. कोळीवाडा, भुसावळ, धर्मराज देवराम कोळी (63) रा. जुने सातारे, मरीमाता मंदिराजवळ, भुसावळ, मुकेश यशवंत पाटील (28), रा. खळवाडी, भुसावळ, शिक्षक नितीन सदाशिव फेगडे (53), रा. गणेश कॉलनी, भुसावळ अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत.





