सोलापूर : कोणत्याही बँकेशी व्यवहार केला नसताना सोलापूर येथील चार्टर्ड अकाऊंटंट व्यावसायीकाच्या बॅंक खात्यातून 10 लाख 60 हजार रुपये अनोळखी खात्यांमधे वळते झाले आहेत. 19 ते 22 मार्च दरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी गणेश मल्लिकार्जुन पावले (रा. वसंत विहार, गणराज बंगला सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. मोबाइल हॅक करुन आपल्या खात्यातील रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आल्याचे तक्रारीत त्यांनी म्हटले आहे.
तक्रारदार सीए गणेश पावले यांचे कन्ना चौकातील अॅक्सिस बँकेत खाते आहे. त्यांच्या बॅंक खात्यातून बँक ऑफ बडोदाच्या एका खात्यात 60 हजार रुपये तर आयडीबीआय बँक दमाणी कॉम्प्लेक्स, नवी पेठ येथील एका खात्यात 7 लाख 50 हजार रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून वर्ग झाले आहेत. याशिवाय आयडीबीआय बॅंकेतील अजून एका खात्यावर 2 लाख 50 हजार रुपये एनईएफटीच्या माध्यमातून वर्ग झाले आहेत. सीए गणेश पावले हे काही दिवस कर्नाटक राज्यात गेले होते. दरम्यान त्यांचा मोबाईल घरीच होता. या कालावधीत त्यांचा मोबाईल हॅक करुन ओटीपी अथवा क्लोनिंग करुन पैसे लंपास केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.