मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या पैशांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासकामी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. बिहार पोलिसांकड़ून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यातील व्यवहारांची तपासणी सुरु आहे.
ईडीने रिया चक्रवर्तीच्या परिवारातील दोन्ही बँक खात्यांच्या माहितीसह सुशांतच्या बँक खात्यांची माहिती संकलीत केली आहे. सुशांतचे वडील के. के. सिंग यांच्या तक्रारीनुसार सन २०१९ मध्ये सुशांतच्या खात्यात १७ कोटी रुपये होते. यातील १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुशांतच्या बॅंक खात्यातून रियासह अन्य मंडळींनी मोठी रक्कम काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुशांतच्या बॅंक खात्यातील रकमेचा रियाने गैरव्यवहार केल्याचा संशय त्यांनी वर्तवला.
दरम्यान सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांनी खुलासा केला आहे. त्यांच्या खुलाशानुसार सुशांतच्या खात्यात एवढे पैसेच नव्हते. यासंदर्भातील कागदपत्रे त्यांनी पोलिसांना दिली आहेत. श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरापासून ते सुशांतसह त्याच्या कंपनीचा व्यवहार त्यांनी हाताळला आहे. सुशांतच्या खात्यातून रियाच्या आईच्या खात्यात केवळ ३३ हजार वर्ग केले होते. त्यानंतर रिया व तिच्या परिवारासोबत कुठलाही व्यवहार झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे
त्यांनी दिलेल्या लेखाजोख्यानुसार जानेवारी २०१९ ते जून २०२० पर्यंत पुढीलप्रमाणे व्यवहार झालेला आहे. २ कोटी ७८ लाख – जीएसटी व आयकर, ६० लाख – भाडे, ६१ लाख – टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे बिल, २ कोटी – कोटक महिंद्रा बँक खात्यात जमा, २६ लाख – लोणावळा फार्म हाऊस भाडे, ४ लाख ८७ हजार – प्रवास खर्च, ५० लाख – विदेशवारी, २.५ कोटी – आसाम ते केरला प्रवास, ९ लाख – मिलाप संस्थेला देणगी. दरम्यान आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे रियाने म्हटले आहे.