पाचोरा पीपल्स बँकेत अपहार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : तत्कालीन सहायक निबंधकांनी पाचोरा पीपल्स बँकेत सन 2011 ते 2016 या कालावधीत बनावट कागदपत्रांचा वापर करत 10 लाख 20 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पाचोरा पिपल्स बॅंकेत गुन्हा दाखल झाला आहे.

सन 2011 ते सन 2016 या कालावधीत सहायक निबंधक पदावर प्रताप बाबा पाडवी होते. या कालावधीत त्यांनी जळगाव येथील श्री समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि कपिल प्रिंटर्सचे विलास जोगेंद्र बेंडाळे यांच्याशी संगनमत केले. बॅंकेची फसवणूक करण्याकामी बनावट दस्तावेज तयार करुन कपिल प्रिंटर्सच्या नावे 2 लाख 6 हजार 425 रुपयांचा आणि समर्थ टूर्स अ‍ॅंण्ड ट्रॅव्हल्सच्या नावे 40 हजार रुपये रोखीने काढून घेतले. याशिवाय सुपडू भादू प्राथमिक शाळेची इमारत निवडणूककामी भाड्याने घेतल्याचे दाखवून भाड्यापोटी 62 हजार 200 रुपयांचे बिल सादर केले. खोटे दस्तावेज व बनावट बिले सादर करत 6 लाख 50 हजार रुपये बँक खात्यातून काढले. अशा प्रकारे एकुण 10 लाख 20 हजार 625 रुपयांच्या अपहार प्रकरणी पंकज सोनार यांच्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि.किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश चौबे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here