तुळजापूर : पुजा-यांमधे हाणामारीसह भाविकांना असभ्य भाषा वापरणे अशा स्वरुपाच्या एकुण तिन घटनांमुळे तुळजापूरचे मंदीर पुन्हा एकवेळा चर्चेत आले आहे. भाविकांनी दिलेल्या दानाची चोरी उघडकीस आल्याची घटना काही महिन्यापुर्वी उघडकीस आली होती. अशा एक ना अनेक भानगडी या मंदीरात उघडकीस येत असतात. अशा घटना उघडकीस आल्यानंतर पुजा-यांना काही दिवस मंदीर बंदी केली जाते. एकुणच भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदीरात अशा घृणास्पद गोष्टींमुळे सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तुळजाभवानी मंदिरातील खासगी सुरक्षा रक्षकाला दोघा जणांनी बेदम मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तिक्ष्ण हत्यारासह दगड, नारळ आणि विटांनी मारहाण 5 एप्रिल रोजी झाली. वैद्यकीय उपचारार्थ त्याला सोलापूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दिपक ज्ञानोबा चौगुले असे मारहाण झालेल्या जखमी खासगी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. दुसऱ्या एका घटनेत दोन पुजाऱ्यांमधे तुंबळ हाणामारी उघडकीस आली आहे. होम कुंडा समोर दोघा पुजाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. तिसऱ्या घटनेत महिला सुरक्षा रक्षकाने भाविकांना अभद्र भाषेचा वापर केला आहे. या अभद्र भाषेमुळे भाविकांमधे संतापाची लाट उसळली होती. माफी मागीतल्यानंतर या घटनेचा समारोप झाला.