तरुणाच्या हत्येचा आरोप, आत्महत्येची चर्चा

जळगाव : दशक्रिया विधीदरम्यान सुरु झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुस-या दिवशी मृतदेह आढळून आला. उत्तम उर्फ पिंटू रघुनाथ ढोणी (33) असे जामनेर तालुक्यातील कापूसवाडी गावातील शेतात मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे. झालेल्या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली असावी अशी गावक-यांमधे चर्चा आहे. याउलट मारहाण करणा-यांनीच त्याची हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. मारेक-यांच्या अटकेशिवाय शव विच्छेदन करु दिले जाणार नसल्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी जामनेर उप जिल्हा रुग्णालयात घेतला होता. तणावाची स्थिती लक्षात घेत शव विच्छेदनकामी मृतदेह जळगाव सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

कापूसवाडी येथे मंगळवारच्या दिवशी दशक्रिया विधीचा कार्यक्रम सुरु होता. त्या कार्यक्रमात काही जणांनी तिघांना मारहाण केली. मारहाण झालेला उत्तम ऊर्फ पिंटू रघूनाथ ढोणी हा तरुण तेव्हापासून बेपत्ता झाला होता. त्यानंतर बुधवारच्या सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जामनेर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी किरण शिंदे यांनी कापूसवाडी येथील घटनास्थळ गाठत माहिती समजून घेतली. तुर्त याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून सामान्य रुग्णालयात मृतदेह शव विच्छेदनकामी रवाना करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here