कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन परीसरातील नीलम गल्लीत मटका किंग, मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याच्यावर मध्यरात्री अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. या हत्या प्रकरणातील चौघे जण फरार झाले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. घटनेनंतर पोलिसांनी जिग्नेशला वैद्यकीय उपचारासाठी फोर्टीज रुग्णालयात पाठवले. मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधिका-यांनी त्यास मृत घोषित केले.
जिग्नेशची हत्या धर्मेश उर्फ नन्नू नितीन शहा व जयपाल उर्फ जापान यांच्यासह अन्य दोघांनी केली असल्याचा संशय आहे. हे चौघे संशयीत आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. तपासकामी पाच तपास पथके तैनात करण्यात आली आहे. जिग्नेश ठक्कर याचे कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे हद्दीत मटका व रमी क्लब असून तो क्रिकेट मॅचवरदेखील सट्टा लावत होता असे समजते. घटनेदरम्यान जिग्नेश हा कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आपल्या कार्यालयात बसला होता.
तेथून तो घरी जाण्यासाठी रात्री कार्यालयाच्या बाहेर आला. त्याचवेळी पाळतीवर बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जिग्नेश ठक्करवर फायर केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.तृप्ती स्टोन क्रशरच्या कार्यालयात जिग्नेश बसलेला असताना त्याठिकाणी हल्लेखोर आरोपी आले. त्यांनी जिग्नेशवर पाच राऊंड फायर केले. कुणी मध्ये आले तर ठोक देंगे असा इशारा देत सर्व आरोपींनी पलायन केले. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.
जिग्नेश व नन्नू शहा हे बालपणीचे मित्र होते. नन्नू शहाच्या विरोधात खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल आहेत. जिग्नेशच्या विरोधात देखील खंडणीसह जबरी चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत. एका खंडणी प्रकरणात जिग्नेश व नन्नू शहा हे दोघे आरोपी होते. 29 जुलै रोजी नन्नू शहाचा मित्र चेतन पटेल व जिग्नेश यांच्यात हाणामारी झाली होती. पटेल याने बाजारपेठ पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीच्या
आधारे जिग्नेश याच्यासह सऊद अक्रम शेख, मनिष श्यामजी चव्हाण यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला होता. जिग्नेशने देखील तक्रार दिली होती. त्याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चेतन पटेल विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा राग नन्नूच्या मनात भरला होता. पूर्वीचा आर्थिक वाद देखील होता. या कारणावरुन नन्नू याने त्याच्या साथीदारासह जिग्नेशची गोळ्य़ा घालून हत्या केल्याचे कारण प्राथमिक तपासात पुढे येत आहे.