जळगाव : एकाच तरुणीने सहा महिन्यात सहावेळा बोहल्यावर चढून नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांना चकवा देत लाखो रुपयांच्या दागिन्यांसह पलायन केले आहे. मात्र सातव्या लग्नाच्या प्रयत्नात तिला पोलिसांनी अटक केली. हा बनावट लग्नाचा प्रकार जळगाव येथील काही महिला ऑपरेट करत असल्याचे अटकेतील आणि वेळोवेळी बोहल्यावर चढलेल्या तरुणीने दौलताबाद पोलिसांजवळ कथन केले आहे. सध्या दौलताबाद पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या तरुणीने जळगाव शहरातील आशा गणेश पाटील, लता बाबूराव पाटील, रिंकू पाटील आणि अंड्यावाल्या काकू (सर्व रा. पांडे चौक, जळगाव) तसेच बाबुराव रामा खिल्लारे (रा. हिंगोली) यांची नावे सांगितली आहेत.
गरजू उपवर तरुण शोधून त्यांना दोन ते पाच लाख रुपयात वधू विकण्याचा गोरखधंदा या टोळीकडून सुरु होता. या रॅकेटने मराठवाडा, खान्देश आणि गुजरात राज्यातील अनेक तरुणांना फसवले आहे. जळगाव शहरातील आशाबाई आणि लताबाई यांनी या अनाथ तरुणीचा सांभाळ केल्यानंतर ती तरुण होताच तिचा वापर करुन बनावट लग्नाचा धंदा सुरु करण्यात आला. या दोन्ही महिला सदर अनाथ तरुणीच्या मावशी असल्याचे समजते. आतापर्यंत सहा बनावट लग्न केल्यानंतर तिने वेळोवेळी संधी साधून दागिन्यांसह पलायन करण्यात यश मिळवले. मात्र सातव्या लग्नात ती पोलिसांच्या ताब्यात आली. एका लग्नासाठी वरपक्षाकडून दोन ते पाच लाख रुपये मिळत असल्याचे तरुणीने म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे लग्न आटोपल्यानंतर काही दिवसातच तिची धुळे जिल्ह्यातील तरुणासोबत लग्नाची तयारी सुरु होती. 26 मार्च रोजी या नवविवाहीत तरुणीला सोबत घेऊन तिचा पती तिला दौलताबाद किल्ला दाखवण्यासाठी घेऊन गेला होता. तुम्ही किल्ला बघण्यासाठी तिकीट काढा, मी खाद्यपदार्थ घेते असे बोलून तिने पतीला चकवा देत लागलीच अंगावरील दागिन्यांसह पलायन केले होते. याप्रकरणी दौलताबादला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दौलताबाद येथून पलायन केल्यानंतर या तरुणीने तिच्या साथीदारांसह अमळनेर गाठले. 6 एप्रिल रोजी ती लागलीच ठरल्यानुसार एका तरुणासोबत बोहल्यावर चढली. दरम्यान त्या तरुणीचे यापुर्वीचे दौलताबाद येथील लग्नाचे फोटो समाज माध्यमांमधे प्रसारित झाले. अमळनेर येथे लग्नाच्या बोहल्यावर चढत असलेली नववधू ही दौलताबाद येथील फोटोतील असल्याचे काही जणांनी ओळखले. ती फसवणूक करणारी असल्याचे लक्षात येताच तिने रॅकेट चालवणा-या सुत्रधारांना कळवले. आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच या टोळीने घेतलेले दोन लाख रुपये परत करुन गुपचूप माघार घेतली. दौलताबाद येथील पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी 10 एप्रिल रोजी तिला ताब्यात घेतले. दौलताबाद पोलिस स्टेशनला तिच्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, संघटित गुन्हा अशा विविध कलमाखाली गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. यापुर्वी या टोळीविरुद्ध जळगाव येथील शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आशाबाई आणि लताबाई या दोघी महिलांना अटक करण्यात आली होती. मात्र जामीनावर बाहेर येताच पुन्हा हा बनावट लग्नाचा धंदा त्यांच्याकडून सुरु करण्यात आला. मुख्य सुत्रधार अद्याप फरार असल्याचे म्हटले जात आहे.