जळगाव : घरफोडीतील निष्पन्न आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल मुळ फिर्यादी तक्रारदार दाम्पत्यास परत देण्यात आला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. संजय ठेंगे यांच्या हस्ते न्यायालयाच्या आदेशाने देण्यात आलेल्या मुद्देमालाची एकुण रक्कम 4 लाख 200 रुपये असून त्यात सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम यांचा समावेश आहे.
संतोष सुधाकर राठोड रा. तळेगाव तांडा हे 23 जानेवारी 2022 रोजी लग्नानिमित्त परिवारासह परगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकुण 5 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला या प्रकरणी 24 जानेवारी 2022 रोजी गु.र.न. 80/22 भा.द.वि.454, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पो.नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. हर्षा जाधव यांनी केला आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोहेकॉ युवराज बंडू नाईक, नितीन किसन आमोदकर, पोना गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना शांताराम सिताराम पवार यांनी सहभाग घेत 27 जानेवारी रोजी आरोपी अशोक चुन्नीलाल चव्हाण (32), रा. कृष्णनगर तांडा, तळेगांव, ता. चाळीसगांव, संदिप उर्फ सॅन्डी भिमसिंग चव्हाण (28), रा. कृष्णनगर तांडा, तळेगांव, ता. चाळीसगांव ह.मु. पडघा, ता. भिवंडी, जि. ठाणे आदींना अटक केली होती. पोलिस कोठडी दरम्यान त्यांच्याकडून 1 लाख 62 हजार 500 रुपये रोख व 2 लाख 37 हजार 700 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण 4 लाख 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत तपास पथकाने घरफोडीचे आरोपी निष्पन्न करुन त्यांना अटक केली होती.