जळगाव : कोरोनाची लाट ओसरल्यानंतर चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पशुखाद्य, वाहतूक दरासह विविध घटकात सातत्याने वाढ झाल्यामुळे चिकनच्या दरात वाढ झाल्याचे कारण सांगितले जात आहे. काही वर्षापुर्वी बर्ड फ्ल्युची साथ आल्यानंतर चिकन विक्रीच्या व्यवसायात मंदीची लाट आली होती. आता कोरोनाची लाट देखील ओसरली असून पशुखाद्यासह वाहतुकीचे भाव वाढताच चिकनचे दर देखील वाढले आहे.
जळगाव येथील हॉटेल शालीमारचे संचालक ललित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमधील चिकन प्लेटच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे वीस टक्के वाढ झाली आहे. अगोदर शंभर व दोनशे रुपयांना मिळणारी चिकन प्लेट आता हॉटेलमधे 120 आणि 240 रुपयात मिळत आहे. या भाववाढीला विविध घटक कारणीभुत आहेत. तेल, गॅस सिलेंडर, कोळसा आणि कांदा या प्रमुख घटकांची भाववाढ चिकन प्लेटच्या दरवाढीला कारणीभुत आहे. 15 किलो तेलाचा डबा 1500 रुपयांवरुन आता सुमारे 2800 रुपये झाला आहे. 1400 रुपयांना मिळणारे गॅस सिलेंडर आता 2100 रुपयांना मिळत आहे. कांद्याच्या भावात नेहमी चढ – उतार सुरु असते. हॉटेलमधे भट्टीसाठी लागणारा कोळसा देखील मोठ्या प्रमाणात महागला आहे. या सर्व घटकांची भाववाढ झाल्यामुळे पर्यायाने हॉटेलमधील खाद्यपदार्थाचे भाव वाढल्याचे ललित पाटील यांनी क्राईम दुनियासोबत बोलतांना सांगितले.
जळगाव येथील चिकन विक्रेता निजाम खाटीक यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी गावरान चिकनचे दर 380 रुपये प्रतिकिलो होते, ते आता 440 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. ब्रॉयलर चिकनचे दर गेल्यावर्षी 160 रुपये प्रतिकिलो होते, ते आता 260 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. कॉकरेल चिकनचे दर गेल्यावर्षी 350 रुपये प्रतिकिलो होते, ते आता 400 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. पशुखाद्यासह वाहतुक दरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. कोरोना काळाच्या सुरुवातीला रोगराई पसरण्याच्या भितीने अनेक पोल्ट्री चालकांनी कोंबड्या नष्ट केल्या. कोंबड्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरतो असा संदेश देखील त्यावेळी पसरला होता. परिणामी काही दिवस चिकन विक्रीवर परिणाम झाला. मात्र काही दिवसांनी लॉकडाऊनची तिव्रता वाढल्यानंतर आरोग्याच्या दृष्टीने पुन्हा चिकन विक्री जोमाने सुरु झाली. महागाईच्या जमान्यात जीभेचे लाड पुरवणे महाग झाले असले तरी खवेय्ये आपली हौस कमी अधिक प्रमाणात पुर्ण केल्याशिवाय रहात नाही हे देखील तेवढेच खरे आहे.