पुणे : पूर्ण चौकशीशिवाय जबरी चोरी सारखा गंभीर गुन्हा दाखल करणे, तक्रार अर्ज नीट न वाचता न तपासता सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करणे अशा दोन प्रकरणी दोन पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व कर्मचारी अशा एकुण ११ जणांना २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा पोलीस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी ठोठावली आहे.
वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमधील डिसेंबर २०१९ च्या एका गुन्ह्यात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह एकुण सात जणांना ही शिक्षा देण्यात आली आहे. या प्रकरणात फिर्यादीच्या घेतलेल्या जवाबानुसार वरिष्ठांच्या परवानगीने गुन्हा दाखल केल्याचे दिसून येत नाही. यात कलम ३९४ नुसार घटना घडल्याबाबतचे कथन केल्याचे दिसून येत नाही.
असे असताना त्यात जबरी चोरीचे ३९४ कलम कसे घेण्यात आले याचा कुठलाही बोध होत नाही. या प्रकरणात नियंत्रण कक्षाकडून आलेल्या कॉलपासून प्रत्येक टप्प्यात हलगर्जीपणा झाल्याचे चौकशीअंती आढळून आले. त्यामुळे ७ जणांना २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुस-या प्रकरणात सप्टेंबर २०१९ मध्ये विमानतळ पोलीस स्टेशनमधील ३५४ (ए), ५००, ५०६, ५०९ व माहिती तंत्रज्ञान कायदा ६७ नुसार गुन्हा नोंद झाला होता.
यात तत्कालीन पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस नाईक अशा चौघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर गुन्हा दाखल करताना त्यापुर्वी संबंधित महिलेचा तक्रार अर्ज नीट वाचून १ ते ५ आरोपींविरुद्ध गुन्हा होतो का? हे तपासले नाही. तपासल्याशिवाय सर्वाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात केवळ एका आरोपीविरुद्ध सकृत दर्शनी पुरावा दिसून येतो.
मात्र इतर २ ते ५ आरोपींविरुद्ध चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेजबाबदार व बेशिस्त वर्तनामुळे निरपराध व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होण्यास कारण ठरले आहे. त्यामुळे चौघांना दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे.