चंदिगड : पंजाबच्या तीन जिल्ह्यांत विषारी दारु प्राशन केल्याने दोन दिवसात 86 हून अधिक लोक दगावले आहेत. मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग यांनी उत्पादन शुल्क विभागातील सात व पोलीस दलातील सहा अशा एकूण तेरा अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. याप्रकरणी दंडाधिकारीय चौकशी देखील जाहीर केली.
पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले असून पंजाब राज्यासाठी हा प्रकार लज्जास्पद प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. लोकांना अशा प्रकारे विष प्राशन करण्यास देवून कुणी सुटणार नाही. पंजाब राज्यातील प्रत्येक नागरिकाचा जीव मोलाचा असून काही मूठभर लोकांच्या हव्यासाने असे बळी जाऊ दिले जाणार नाहीत.
जे कुणी दोषी असतील त्यांची कुणाचीही गय केली जाणार नाही असे मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. तसेच मृतांच्या परिवारास दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देखील त्यांनी जाहिर केले आहे. सर्वाधिक ६३ मृत्यू तरणतारण जिल्ह्यात आणि अमृतसर (ग्रामीण) व गुरदासपूरमध्ये (बटाला) या जिल्हयात अनुक्रमे १२ व ११ लोकांचे प्राण या दारुमुळे गेले आहेत.