जळगाव : नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान आज पाच गावठी कट्टे, दहा राऊंड, चारचाकी वाहन तसेच मोबाईल असा 6 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून त्यांचे दोघे साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. दोघा फरार आरोपींच्या मागावर पोलिस पथक असून त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
कट्टा विकत घेणा-या मयूर काशिनाथ वाकडे रा.अरुण नगर चोपडा व अक्रम खान शेरखान पठाण रा. हरसुल औरंगाबाद या दोघांना या गुन्ह्याकामी अटक करण्यात आली आहे. अरुण नवनाथ सोनवणे रा. पुणे निगडी तसेच कट्टा देणारा लाखनसिंग मोहसिंग बरणालारा रा. पार उमर्टी ता.वरला जि.बडवाणी (मध्यप्रदेश) असे दोघे फरार झाले आहेत. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 39/2022 आर्म अँक्ट 3/25, 7/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलिस करत आहेत.