वाळूज : सोबत शिकणा-या विद्यार्थ्याने सातवीच्या वर्गातील बारा वर्षाच्या विद्यार्थीनीला एक प्रेमपत्र लिहीले. ते प्रेमपत्र त्या विद्यार्थीनीने थेट शिक्षकांनाच सादर केले. आपले पत्र त्या विद्यार्थीनीने शिक्षकांना दिल्याचे समजताच विद्यार्थ्याची घाबरगुंडी वळाली. त्याने पलायन केले. तो सापडल्यानंतर खरा प्रकार सर्वांच्या लक्षात आला. मात्र दरम्यानच्या कालावधीत पालकवर्गाने शाळा प्रशासनालाच दोष देत धारेवर धरले होते.
वाळूज येथील एका शाळेतील बारा वर्ष वयाचा एक विद्यार्थी गेल्या तिन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाला होता. त्या विद्यार्थ्याच्या जीवाचे काहीतरी बरेवाईट झाले असेल व शाळा प्रशासन या प्रकाराला दोषी आहे असे समजून त्याच्या नातलगांनी सलग दोन दिवस शाळा प्रशासनाला धारेवर धरुन ठेवले. तिन दिवसांनी 22 एप्रिल रोजी तो विद्यार्थी नेवासा तालुक्यातील देवगड येथील एका हॉटेलमधे पालकांना आढळून आला. पळून जाण्याचे खरे कारण समजल्यानंतर पालकांनी डोक्याला हात लावून घेतला. आपण उगीच शाळा प्रशासनाला दोष दिला याची त्यांना जाणीव झाली. या विद्यार्थ्याने काही महिन्यापुर्वी देखील असाच प्रकार एका मुलीसोबत केला होता. त्यावेळी पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्याला चोप देण्यात आला होता. यावेळी देखील त्याने अन्य एका मुलीसोबत असाच प्रकार केला. आता पुन्हा आपल्याला मार बसेल या भितीने त्याने घर सोडून पलायन केले होते. दरम्यान तो बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.