जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): आनंद सदाशिव माळी हा नुकताच तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला तरुण होता. वयाची नुकतीच विशी ओलांडलेल्या आनंदची मिशी अजून कोवळी होती. दुनियादारीचे फारसे ज्ञान नसलेला दहावीपर्यंत जेमतेम शिक्षण घेतलेल्या आनंदला मद्यपानाचे व्यसन जडले होते. अल्पवयातच मद्यपानाचे व्यसन जडलेल्या आनंदचा पंधरा वर्ष वयाचा एक बालमित्र होता. आनंदच्या नादी लागून त्याला देखील मद्यपानाचे व्यसन जडले होते. पंधरा वर्ष वयाचा तो अल्पवयीन मित्र त्याच्या घराजवळच रहात होता. आनंदच्या संगतीत आल्याने तो देखील देवदास बनला होता. अशाप्रकारे आनंद आणि त्याचा तो बालमित्र दर शनिवारी मेहरुण तलाव परिसरात मद्यपानासाठी न चुकता जात होते.
मॅकडॉल व्हिस्की हा दोघांचा आवडता ब्रॅंड होता. भारतीय चलन 140 रुपये किमतीची क्वार्टर प्रमाणातील व्हिस्की प्राशन केल्यानंतर दोघांचा शारिरीक व मानसिक थकवा पळून जात असे. मद्याचे घोट घशाखाली रिचवल्यानंतर दोघांच्या वागण्या – बोलण्यात क्षणीक परिवर्तन होत असे. 140 रुपये किमतीची व्हिस्की, पाण्याची लहान बाटली, दोन डिस्पोजल ग्लास आणि जोडीला अल्प स्वरुपातील खाद्यपदार्थ (चखणा) असे साहित्य घेतल्यानंतर ते जळगावच्या मेहरुण तलाव परिसरातील निवांत आणि मोफत जागेचा आसरा घेत असत. या मोफत जागेचा ते मद्यप्राशन करण्यासाठी पुरेपुर वापर करुन घेत होते. हॉटेलमधे गेल्यावर सिटींग चार्ज द्यावा लागतो. मात्र ओसाड निर्मनुष्य जागी मद्यप्राशन करायला गेल्यावर सिटींग आणि वेटर चार्ज लागत नाही. त्यामुळे अनेक मद्यशौकीन अशा एकांत जागेची निवड करत असतात. त्याला आनंद व त्याचा अल्पवयीन साथीदार देखील अपवाद नव्हते. आनंदचे वडील बांधकाम ठेकेदाराकडे मजुरीने कामाला जात होते. जेमतेम दहावी शिकलेला आनंद एका पाईप कंपनीत रोजंदारीने कामाला जात होता. महिन्याच्या प्रत्येक शनिवारी आनंद व त्याचा बालमित्र ठरवून मद्यप्राशनाचा आनंद लुटत होते. कधी आनंद तर कधी त्याचा अल्पवयीन मित्र मद्याचा खर्च पेलत होता. दर शनिवारी मद्यप्राशन करण्याच्या दोघा मित्रांच्या कार्यक्रमाला अखेर लगाम बसला.
9 एप्रिल 2022 हा शनिवारचा दिवस होता. या दिवशी आनंद आणि त्याचा साथीदार असे दोघेजण सकाळी दहा वाजता इच्छादेवी मंदीर परिसरात एकमेकांना भेटले. इच्छादेवी मंदीर परिसरातील मद्याचे दुकान ग्राहकांच्या प्रतिक्षेत उघडले होते. या दुकानातून आनंदने त्याचा आवडता ब्रॅंड, मॅकडॉल व्हिस्कीची क्वार्टर घेतली. तेथून नेहमीप्रमाणे दोघांनी डी मार्ट मार्गे मेहरुण तलावाच्या दिशेने मार्गक्रमण केले. डी मार्टसमोर असलेल्या एका हातगाडीवरुन दोन डिस्पोजल ग्लास व पुढे मेहरुण तलाव परिसरातून पाण्याची बाटली असा मद्यपानाला आवश्यक घटकांचा संच त्यांनी तयार केला. आता आपल्याला कुणी बोलणार नाही व टोकणार नाही असा मनाशी समज करुन दोघांनी एका झाडाखाली मद्यपानासाठी भारतीय बैठक जमवली. हळूहळू दोघांचा कार्यक्रम रंगात येण्यास सुरुवात झाली होती.
दरम्यान त्याठिकाणी दिनेश पाटील नावाचा तरुण देखील आला. घरुन निघतांना पत्नीसोबत वाद झाल्याने दिनेश पाटील हा अगोदरच तणावात होता. त्याला देखील तणाव घालवण्यासाठी मद्यपान करायचे होते. त्यामुळे दिनेश देखील मद्यप्राशन करण्यासाठी रिकाम्या जागेच्या शोधात होता. दिनेश हा दोघांसाठी अनोळखी होता. दरम्यान त्याची नजर आनंद व त्याचा साथीदार अशा दोघांवर गेली. एवढ्या कमी वयात दोघे मुले मद्यपान करत असल्याचे बघून दिनेशला त्यांचा राग आला. साधी मिसरुड देखील फुटलेली नसतांना दोन्ही मुले मद्याच्या आहारी गेल्याचे बघून तो त्यांच्यावर चिडला. हे मद्य पिण्याचे तुमचे वय आहे का रे? असे दिनेशने दोघांना अधिकारवाणीने दरडावले. अगोदरच पत्नीसोबत वाद झाल्याने तणावाखाली असलेल्या दिनेशने संतापाच्या भरात आनंदच्या बालमित्राच्या कानशिलात लगावली. आपल्यापेक्षा वयाने मोठा आणि शरीराने दणकट असलेल्या दिनेशने संतापात आपल्या बालमित्राच्या कानशिलात लगावल्याचे बघून आनंद काही वेळ स्तब्ध झाला. मात्र कानशिलात बसल्यामुळे आनंदच्या बालमित्राच्या मनातील खुद्दारी जागी झाली. तो केवळ पंधरा वर्षाचा असला तरी चढ्या आवाजात दिनेशला म्हणाला की आम्ही आमच्या पैशाने विकत घेऊन मद्य घेतो.
शब्दामागे शब्द वाढवून अगोदरच खराब झालेली मनस्थिती अजून खराब करण्यापेक्षा इथून निघून गेलेले बरे असे मनाशी म्हणत दिनेशने तेथून काढता पाय घेतला. दिनेश तेथून निघून गेल्यावर या दोघांची देखील मानसिकता बिघडली होती. दोघांनी आपले उर्वरीत मद्याचे घोट घशाखाली ढकलून पेग पुर्ण केला. कधी मनातल्या मनात तर कधी मुखावाटे दोघांनी दिनेशबद्दल आपला राग व्यक्त करत तेथून आपापल्या घराच्या दिशेने प्रस्थान केले. वाटेत सिमेंटच्या नाल्यालगत दिनेश मद्याच्या नशेत लोळत पडल्याचे दोघांनी पाहिले. जवळच त्याची मोटार सायकल देखील उभी होती. त्याला पाहताच दोघे क्षणभर अवाक झाले. आनंदच्या बालमित्राने त्याला निरखून पाहिले असता हा तोच आपल्या कानशिलात मारणारा असल्याचे त्याने ओळखले. संतापाच्या भरात आनंदच्या बालमित्राने जवळच पडलेला दगड उचलून त्याच्या मोटारसायकलच्या दिशेने भिरकावला. दगडाचा मार लागताच दिनेशची मोटार सायकल खाली पडली. त्यानंतर दिनेशच्या दिशेने दोघांनी दगड भिरकावण्यास सुरुवात केली. दगडाने ठेचला गेल्यामुळे मद्याच्या नशेतील दिनेश जखमी झाला. संधी मिळाल्याने दोघांनी दिनेशवर दगडफेक करुन आपला सर्व संताप बाहेर काढला.
आपल्या बालमित्राचा वाढत असलेला संताप बघून आनंदने त्याला ओढून दुर केले. त्यानंतर दोघे पुन्हा इच्छादेवी मंदीराकडे आले. त्यावेळी दुपारचे दोन वाजून गेले होते. काही वेळाने दोघे जण आणखी एका मित्राला भेटायला गेले. आम्ही हाफ मर्डर केला असल्याचे दोघांनी त्या मित्राला कथन केले. हाफ मर्डर कुठे केला व कुणाचा केला हे बघण्याची उत्सुकता दोघांच्या त्या तिस-या मित्राला लागली. त्याने दोघांना लागलीच आपल्या मोटार सायकलवर बसवून घेतले. वाटेत इच्छादेवी चौकात आनंद मोटारसायकलवरुन खाली उतरुन गेला. त्यानंतर दोघे मेहरुण तलाव परिसरातील घटनास्थळी गेले. त्याठिकाणी अजूनही दिनेश रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता. यावेळी पुन्हा दिनेशच्या डोक्यावर आणि इतर अंगावर आनंदच्या बालमित्राने दगडफेक करुन त्याला मोठ्या प्रमाणात जखमी केले. जखमी दिनेशचा मोबाईल आनंदच्या बालमित्राने काढून घेतला. त्यानंतर दोघांनी तेथून लागलीच पलायन केले. दरम्यान दिनेशची पत्नी त्याला सारखे सारखे फोन करत होती. मात्र दिनेशचा फोन लागत नसल्याने ती तणावात आली होती. दिनेशसोबत वाद झाल्याने त्याची पत्नी चोपडा तालुक्यात माहेरी निघून आली होती. तीने दिनेशचा भाऊ जिजाबराव यास फोन करुन सर्व प्रकार कथन केला.
दगडाने ठेचून प्राणघातक हल्ल्यात तरुण जखमी झाला असल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे प्रभारी पो.नि. अरुण धनवडे यांच्यासह पोलिस उप – निरीक्षक अनिस शेख, पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, किशोर पाटील, सुधीर साळवे, इमरान सैय्यद, गोविंदा पाटील, मुकेश पाटील, मुदस्सर काझी, सचिन पाटील, योगेश बारी, हेमंत कळसकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पथक घटनास्थळावर पोहोचण्यापुर्वीच दिनेशने आपला जीव सोडला होता. त्याच्या मोटार सायकलच्या क्रमांकावरुन त्याची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातून दुचाकी मालक व त्याचा मोबाईल क्रमांक मिळवण्यात आला. घटनास्थळावरील मयत हा दुचाकी चालक दिनेश पाटील असल्याचे निष्पन्न झाले. दिनेश भिकन पाटील हा सुप्रिम कंपनीतील कर्मचारी असल्याची माहिती अधिक तपासात पुढे आली. दिनेशचा मृतदेह शव विच्छेदनकामी सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत दिनेशचा भाऊ जीजाबराव पाटील व काही नातेवाईक लागलीच एमआयडीसी पोलिस स्टेशनला आले. तेव्हा पोलीसांनी त्यांना सामान्य रुग्णालयात जावून मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितले. सर्वजण लागलीच सामान्य रुग्णालयात गेले. शव विच्छेदन गृहात शव पाहताच सर्वांनी दिनेश यास ओळखले. सकाळी पत्नीसोबत दिनेशचा वाद झाल्याचे त्याचा भाऊ जिजाबराव यास समजले होते. त्यानंतर दुपारी दगडाने ठेचून त्याची हत्या झाल्याचे समजताच जिजाबराव पाटील यास रडू कोसळले. दिनेश पाटील याच्या हत्येप्रकरणी त्याचा भाऊ जिजाबराव पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 249/22 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला.
पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्याकडे सोपवला. या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांनी पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, पोना राहुल पाटील, विजय पाटील, प्रितम पाटील, पोलिस नाईक इश्वर पाटील, संदीप साळवे, पोहेकॉ भारत पाटील, विजय चौधरी दर्शन ढाकणे आदींचे दोन पथक तयार केले. जळगाव शहराच्या तांबापुरा परिसरातील एका अल्पवयीन बालकाने सदर गुन्हा केल्याची गोपनीय माहिती तपासादरम्यान पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या तपास पथकातील सहका-यांना योग्य त्या सुचना दिल्या. टप्प्याटप्याने माहिती घेत तपास पथकाने तांबापुरा भागातून एका संशयीत बालकास ताब्यात घेत त्याची विचारपुस केली. हळूहळू त्याच्याकडून घटनेची हकीकत बाहेर येण्यास सुरुवात झाली.
घटनेच्या दिवशी दुपारच्या वेळी सदर अल्पवयीन बालक व त्याचा साथीदार आनंद सदाशिव माळी असे दोघे जण मेहरुण तलावाकाठी मद्यप्राशन करत बसले होते. त्याच ठिकाणी काही अंतरावर एका भिंतीच्या आडोशाला दिनेश पाटील हा देखील मद्यप्राशन करण्यासाठी जागेच्या शोधात आला. दरम्यान आपल्यासमोर मद्यप्राशन करणारे दोघे आपल्यापेक्षा खुपच लहान असल्याचे बघून त्याने दोघांना हटकले. तुम्ही अजून लहान असून तुमचे मद्यप्राशन करण्याचे वय आहे का? अशी मयत दिनेश पाटील याने दोघांना विचारणा केली. इथून उठा आणि निघून जा असे दिनेशने दोघांना खडसावले. अगोदरच पत्नीसोबत वाद झाल्याने संतापात असलेल्या दिनेशने आनंदच्या बालमित्राच्या श्रीमुखात लगावून दिली. त्यामुळे या अल्पवयीन बालकाचा संताप अनावर झाला होता. मद्यप्राशन करत असतांना हटकल्याबद्दल दोघांना दिनेशचा राग आला. त्यामुळे संतापाच्या भरात दोघांनी मिळून दिनेश यास जवळच पडलेल्या दगडाने ठेचून काढले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यातील अल्पवयीन बालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा मित्र आनंद माळी याला देखील तपास पथकाने ताब्यात घेत अटक केली. त्याने देखील आपला गुन्हा कबुल केला. दोघांना अधिक तपासकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अल्पवयीन बालकाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली. आनंद सदाशिव माळी याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुरुवातीला त्याला 20 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्याच्या न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश देण्यात आले. या गुन्ह्याच्या आरोपींबाबत प्रथमदर्शनी कोणतीही माहिती तसेच कोणताही भौतीक पुरावा उपलब्ध नव्हता. तरी देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारंपारीक पध्दतीने सदर खूनाचा गुन्हा अल्प कालावधीत उघडकीस आणला. या गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप शिकारे व त्यांचे सहकारी राजेंद्र कांडेकर, दिपक चोधरी करत आहेत.