जळगाव : परिवारासह परगावी गेल्याने बंद असलेल्या घराचे कुलुप तोडून सुमारे 4 लाख 97 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत उघड झाला आहे. या घटनेत अडीच लाख रुपये रोख व सव्वा दोन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहीत इंद्रकुमार मंधवाणी यांचे बळीराम पेठ भागात होम अप्लायंसेसचे (किचन वेअर) दुकान असून ते सिंधी कॉलनीत वास्तव्याला आहेत. अमरावती येथे आतेभावाच्या लग्नानिमीत्त ते परिवारासह गेले होते. घराला कुलुप असल्याचे बघून 22 ते 25 एप्रिल दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश मिळवला. 25 एप्रिल रोजी मंधवाणी आपल्या परिवारासह परत आले. त्यावेळी मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला त्यांना आढळून आला. घरातील सामान देखील अस्ताव्यस्त झालेले होते.
अडीच लाख रुपये रोख, सव्वा दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 20 हजार रुपये किमतीची मिक्सरसाठी लागणा-या एकुण चाळीस इलेक्ट्रीक मोटारी, 2100 रुपये किमतीचे प्रत्येकी 10 ग्रॅम वजनाचे एकुण 60 ग्रॅम चांदीचे सहा शिक्के असा एकुण 4 लाख 97 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.