जळगाव : शहराच्या रामेश्वर कॉलनी भागातील वार्ड क्रमांक 14 स्वामी समर्थ चौकात लोकांना येण्याजाण्यासाठी रस्ता नव्हता. गेल्या एक महिन्यापासून या परिसरात गटार बांधून त्यावर स्लॅब टाकण्यात आला होता. पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूने तात्पुरत्या स्वरुपातील कच्ची गटार करण्यात आली होती. नाल्यासमान तयार झालेल्या गटारीमुळे परिसरातील नागरिकांना येण्याजाण्यासाठी मोठा द्रविडी प्राणायम करावा लागत होता. गटारीच्या पाण्यातून आपली वाहने ढकलून न्यावी लागत होती.
परिसरातील नागरिकांसह निलेश नारखेडे, वैभव पाटील, रुपेश बोंडे, गौरव पाटील, सागर पाटील, ललित पिंपळकर, योगेश सुर्यवंशी व सुधाकर महाजन आदींनी महापौर जयश्रीताई महाजन व त्यांचे पती विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांची भेट घेत होणारी गैरसोय लक्षात आणून दिली. या प्रकाराची महाजन दाम्पत्याने तातडीने दखल घेत जेसीबी पाठवून पुढील कामाला सुरुवात केली. लोकांना रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन दिल्यामुळे लोकांनी महाजन दाम्पत्याचे आभार मानले.