तर …………पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील दहा करोड जनतेची कमाई बंद झाली आहे. चाळीस करोड परिवार कोरोना प्रभावित झाले आहेत. लोकांच्या नोकऱ्या जाण्याच्या विषयावर तोडगा निघाला नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागू शकेल असे विधान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
संजय राऊत यांनी म्हटले आहे मध्यमवर्गीय लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यापार आणि उद्योगांचे चार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. लोकांच्या सहनशक्तीची मर्यादा असते. जनता केवळ अपेक्षा आणि आश्वासनावर जिवंत राहू शकत नाहीत. प्रभू श्रीरामांचा वनवास संपला असला तरी आताचा काळ कठीण आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगल्याप्रकारे माहिती आहे. आयुष्यात यापूर्वी एवढे असुरक्षित कुणाला वाटल नसेल असे ही राऊत यांनी म्हटले आहे.
इस्त्राईलमध्ये पंतप्रधान बेंजामिक नेतन्याहू यांच्याविरुद्ध चिडलेल्या लोकांनी प्रदर्शने सुरु केली आहेत. कोरोना महामारी आणि जागतिक आर्थिक संकटासोबत मुकाबला करण्यास असफल राहिल्यामुळे तेथील लोकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भारतात देखील हे पाहायला मिळू शकते असे त्यांनी म्हटले आहे. राफेलच्या आधी भारतात सुखोई, एमआयजी विमाने आणली गेली. मात्र राफेलसारखा जल्लोष कधी करण्यात आला नाही. या विमानांमधे बेरोजगारी संपुष्टात आणण्याची क्षमता आहे का? असा सवाल खा. संजय राऊत यांनी केला आहे.