जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): शालेय जीवनात रमलेली सोनाक्षी दिसायला देखणी होती. चौदा वर्षाची सोनाक्षी भुसावळ शहरातील एका नामांकीत शाळेत शिक्षण घेत होती. पाण्याचे माठ आणि जार विकून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे सोनाक्षीचे वडील तिला चांगले शिक्षण मिळावे म्हणून धडपडत होते. आपल्या मुलीने उच्च शिक्षण घेवून तिच्यासह आपल्या परिवाराचे नाव उज्वल व्हावे ही त्यांची माफक अपेक्षा होती. त्यासाठीच त्यांनी तिला चांगल्या शाळेत दाखल केले होते.
विविध सांस्कृतीक कार्यक्रमात सोनाक्षी न चुकता भाग घेत होती. अवघी चौदा वर्षाची सोनाक्षी दिसायला एखाद्या राजकुमारी समान होती. तिच्या सौंदर्यावर एका नराधमाची वक्रदृष्टी पडण्यास वेळ लागला नाही. रितेश असे त्या नराधामाचे नाव होते. तिच्या सौंदर्याचा उपभोग घेण्याचा त्याने मनाशी पक्का विचार केला होता. ती रहात असलेल्या परिसरातच रितेश नावाचा तो नराधम देखील रहात होता. त्याची आई भुसावळ आणि यावल परिसरात कुंटणखाना चालवत असल्याचे म्हटले जाते. कुंटणखान्यासाठी देखील सोनाक्षीचा वापर करुन घेण्यासाठी त्या नराधाचा प्रयत्न सुरु होता. त्या दृष्टीने सोनाक्षीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा तो प्रयत्न करत होता. त्या विचारातून त्याने तशी व्युहरचना सुरु केली होती.
शालेय जीवनात एका सांस्कृतीक कार्यक्रमात सोनाक्षीने सहभाग घेतला होता. त्या कार्यक्रमाच्या वेळी रितेशने तिचे चोरुन लपून केव्हातरी फोटो काढले होते. कार्यक्रमात आपला रोल आणि त्या अदाकारीचा सराव पुर्ण करण्यात मग्न असलेल्या सोनाक्षीचे फोटो रितेशने केव्हा आणि कसे काढले हे तिलाच माहीत नव्हते. ती आपला कार्यक्रमातील रोल यशस्वी करण्यात मग्न होती. तिच्या त्या फोटोत रितेशने संगणकाच्या मदतीने संपादन करण्यास सुरुवात केली. तिच्या मुळ फोटोत त्याने छेडछाड केली. तिच्या फोटोला त्याने नग्न स्वरुप देण्यास सुरुवात केली. त्यात त्याला ब-यापैकी यश आले. आता या फोटोच्या बळावर आपण सोनाक्षीला हवे तसे झुकवू शकतो, हवे तसे नमवू शकतो असा त्याच्या मनात विश्वास निर्माण झाला.
एके दिवशी त्याने तिला शाळेजवळ एकांतात गाठले. तिचे संपादीत केलेले ते फोटो आणि व्हिडीओ त्याने तिला दाखवले. तुझ्या फोटोचा हुकुमी एक्का माझ्याकडे असून आता मी सांगेन तसे तुला करावे लागेल. नाहीतर हे फोटो आणि व्हिडीओ मी शाळेत आणि समाजात प्रसारीत करेन. त्यात तुझी बदनामी होईल असे त्याने धमकावले. आपले नग्नावस्थेतील फोटो आणि व्हिडीओ बघून सोनाक्षीला रडूच आले. तिच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकली होती. काय करावे, कुणाची मदत मागावी हे तिला सुचेनासे झाले. विचार करण्याची संधी रितेशने तिला दिलीच नाही. बंटी आणि राहुल नावाचे त्याचे दोन मित्र त्याच्या आजुबाजूला दबा धरुन उभे होते.
रितेशने तिला आपल्या मोटारसायकलवर बळजबरी डबलसिट बसण्यास भाग पाडले. त्याचवेळी तिच्यासोबतच रितेशने त्याचे मित्र बंटी आणि राहुल यांना देखील बसवून घेतले. अशा प्रकारे चौघे जण मोटार सायकलवर बसल्यानंतर रितेशने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल भुसावळ शहरातील इंजीन घाट परिसरात नेली. त्या ठिकाणी चौघे जण खाली उतरले. तिघांसोबत आलेली सोनाक्षी हतबल झाली होती. तिला विचार करण्याची वा कुणाला मदतीला बोलावण्याची संधी कुणीही दिली नव्हती. सोनाक्षीची इच्छा नसतांना रितेशने तिच्यासोबत बळजबरी शरीरसंबंध निर्माण केले. या शरीरसंबंधाचे बंटी व राहुल या दोघांनी फोटोसेशन केले. सोनाक्षीच्या वडीलांनी तिला शैक्षणीक खर्चासाठी दोनशे रुपये दिले होते. ते दोनशे रुपये आणि तिच्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी रितेशने तिच्याकडून बळजबरी काढून घेतली. त्यानंतर तिघांनी तिला पुन्हा शाळेजवळ आणून सोडून दिले. झालेला प्रकार कुणाला सांगायचा नाही अशी दमबाजी तिला करण्यास रितेश विसरला नाही. कुणाला सांगितले तर आता नव्याने काढलेले फोटो सर्वत्र व्हायरल करेन. त्यात तुझी बदनामी होईल असे रितेशने तिला आवर्जून सांगितले.
रितेशच्या आईचा भुसावळ आणि यावल परिसरात कुंटणखाना असल्याचे सोनाक्षीला समजले होते. सोनाक्षीचा या व्यवसायात उपयोग करुन घेण्याचा विचार रितेशने केला होता. आता रितेशची आई आणि बहिण हे देखील तिला छळण्यास सरसावले होते. त्या मायलेकींनी तिला घरातून पैसे चोरुन आणण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे सोनाक्षी या सर्व बदमाशांच्या जाळ्यात पुरती फसली होती. तिचे नग्न फोटो हेच सर्वांचे तिला छळण्याचे आणि लुटण्याचे एकमेव भांडवल होते. त्या फोटोच्या भांडवलावर सर्वजण तिचा जमेल तसा छळ करत होते. एवढे कमी झाले म्हणून की काय म्हणून उर्वेश नावाचा रितेशचा अजून एक मित्र देखील तिला छळण्यासाठी आता सरसावला होता. ती शाळेत जातांना तो तिच्या मागावर राहू लागला. तो सतत तिची सायकल पंक्चर करु लागला. सोनाक्षीने तिच्या मैत्रीणींसोबत राहू नये, तिचे शैक्षणीक नुकसान व्हावे हा त्याचा मुख्य उद्देश होता. याशिवाय तिने रितेशच्या आई व बहिणीसोबत रहावे यासाठी देखील तिला त्रास देण्याचे काम सुरु झाले होते. सोनाक्षीने आपल्या आई व बहिणीसोबत रहावे यासाठी फोटोचा धाक दाखवून रितेश तिला आपल्या घरी नेवू लागला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करु लागला.
दरम्यान काळ पुढे पुढे सरकत होता. सोनाक्षी दिवसेंदिवस मोठी होत गेली. सोनाक्षी आता महाविद्यालयात जावू लागली. मात्र या टोळीच्या कचाट्यातून ती सुटू शकली नाही. तिचा छळ सुरुच होता. काही दिवसांनी रितेशच्या बहिणीचे लग्न ठरले. दरम्यान एके दिवशी रितेशसह त्याची बहिण, सुनिल व उर्वेश या सर्वांनी तिला एकांतात गाठले. रितेशच्या बहिणीच्या सांगण्यावरुन रितेशने तिच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बळजबरी काढून घेतली. ती चेन त्याने त्याच्या बहिणीला दिली. किमान पन्नास हजार रुपये बहिणीच्या लग्नासाठी घरुन घेवून ये म्हणत रितेशने सोनाक्षीजवळ तगादा लावला. अन्यथा फोटो व्हायरल करण्याची ठरलेली धमकी तिला देण्यात आली. महाविद्यालयीन फी जमा करण्याच्या नावाखाली खोटे बोलून सोनाक्षीने आपल्या पालकांकडून पन्नास हजार रुपये घेतले. ते पैसे तिने रितेशला दिले. रितेशच्या आईचा यावल व भुसावळ परिसरात कुंटणखाना असल्याने त्या व्यवसायात सोनाक्षीला ओढण्याचा प्रयत्न आता सुरु झाला होता. सोनाक्षी आता महाविद्यालयीन तरुणी झाली होती. एके दिवशी तिला यावल तालुक्यातील एका गावात आणि जळगाव शहरातील एका परिसरात रितेशने नेले. या परिसरात तिच्यावर लैंगीक अत्याचार करण्यात आले.
तारुण्यात पदार्पन केलेल्या व लग्नायोग्य झालेल्या सोनाक्षीच्या लग्नाच्या हालचाली तिच्या पालकांनी सुरु केल्या होत्या. सोनाक्षीच्या लग्नाचा विषय तिच्या घरात सुरु असल्याचे समजताच रितेशने तिला 19 एप्रिल रोजी धमकी दिली. मी तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देत त्याने तिला बळजबरी आपल्या मोटार सायकलवर बसवून घेतले. जळगाव शहरातील बिग बजार परिसरात एकांतात त्याने तिला नेले. त्याठिकाणी तिच्या सर्वांगाला स्पर्श करत तो तिला म्हणाला की मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. यावेळी देखील त्याने तिच्या हाताच्या बोटातील अंगठी हिसकावून घेत तिला भुसावळ येथे सोडून दिले.
अखेर वैतागलेल्या सोनाक्षीने रितेश याच्यासह त्याची आई, वडील, बहिण, उर्वेश, बंटी व राहुल अशा एकुण सात जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे ठरवले. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांची भेट घेत तिने आपली व्यथा कथन केली. पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांनी आपले सहकारी पोलिस उप निरीक्षक अरुण सोनार यांच्या उपस्थितीत आस्थेवाईकपणे तिची दर्दभरी दास्तान श्रवण केली. तिच्या व्यथेचा शुन्य मिनीटात सारांश काढल्याननंतर तिची फिर्याद घेण्यास त्यांनी संबंधीत कर्मचा-यास आदेश दिले. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 104/22 भा.द.वि. 376 (2) (एन), 392, 354 अ, 506, 34, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 5 (एल), 6 नुसार दाखल करण्यात आला.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांनी पोलिस उप – निरीक्षक अरुण सोनार यांच्याकडे सुपुर्द केला. पोलिस उप निरीक्षक अरुण सोनार यांनी आपले सहकारी ओमप्रकाश सोनी यांच्या मदतीने पुढील तपासाला प्रचंड प्रमाणात गती दिली. पिडीतेची वैद्यकीय तपासणी, आरोपींना अटक, आरोपींना वेळेवर न्यायालयात हजर करणे आदी सर्व सोपास्कर पोलिस उप निरीक्षक अरुण सोनार व त्यांचे सहकारी ओमप्रकाश सोनी यांनी वेळेच्या आत तहान भुक विसरुन लिलया पार पाडले. (या कथेतील पिडीतेचे “सोनाक्षी” हे नाव काल्पनिक घेण्यात आले आहे.)