केळी विकत घेण्याच्या वादाने घेतले हिंसक वळण

जळगाव : केळी विक्रेत्याकडे शिल्लक राहिलेली दोन डझन केळी विकत घेण्यावरुन दोघात झालेल्या वादाचे पर्यावसन चाकू हल्ल्यात झाल्याने एक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोजा (उपवास) सोडण्यासाठी 1 मे रोजी सायंकाळी केळी विकत घेण्यासाठी अजहर खान इकबाल खान (25) व त्याचा मित्र अशरफ खान असे दोघे केळी विक्रेत्याकडे आले होते. त्यावेळी केळी विक्रेत्याकडे शेवटची दोन डझन केळी राहिली होती. ती केळी अजहर खान याने विकत घेतली. त्याचवेळी दानिश पिरजादे व रहिम पिरजादे हे दोघे त्याठिकाणी केळी विक्रेत्याकडे आले. अजहर याने विकत घेतलेली केळी बळजबरी विकत घेण्यासाठी दानिश आणि रहिम प्रयत्न करु लागले. त्यात अजहर आणि दानिस व रहिम यांच्यात वाद सुरु झाला. दरम्यान रहिम याने फोन करुन पप्पू, दारा व मुस्तकीन या तिघांना बोलावून घेतले. येतांना तिघे हातात लाठ्या काठ्या घेऊनच आले. दानिश पिरजादे याने त्याच्याकडील चाकूने अशरफ खान याच्या गालावर मारला. अशरफ याचा बचाव करण्यासाठी गेलेल्या अजहर खान याच्या दोन्ही हातांवर, तळव्यावर मारुन त्याला देखील दुखापत करण्यात आली.

हल्ला  करणा-या रहीम पिरजादे, पपु पिरजादे, मुस्तकीन पिरजादे या तिघांनी अजहर खान आणि अशरफ खान या दोघा मित्रांना जमीनीवर खाली पाडून लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. त्यामुळे दोघे जखमी झाले. दोघांचा ओरडण्याचा आवाज ऐकून मोहीन खान व आवेश खान हे त्याठिकाणी धावत आले. त्यांनी अजहर आणी अशरफ या दोघांचा बचाव करत  सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी अजहर खान याने दिलेल्या जवाबानुसार दानिश पिरजादे, पपु पिरजादे, दारा पिरजादे, मुस्तकीन पिरजादे, रहिम पिरजादे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 316 /2022 भा.द.वि. 326,324, 143 147 148, 149 नुसार दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच सहायक  पोलिस अधिक्षक डॉ. कुमार चिंता  यांच्यासह एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे तसेच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद, मुदस्सर काजी, महेंद्रसिंग पाटील, विकास सातदिवे, मुकेश पाटील, सतीश गर्जे, किशोर पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, साईनाथ मुंडे आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत शांतता प्रस्थापीत करत कारवाईला  वेग दिला.

गुन्हा घडल्यानंतर सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांनी आरोपींचा शोध घेण्याकामी गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांना योग्य त्या सुचना दिल्या. दानिश जलालुद्दीन पिरजादे व पप्पू शफोद्दिन पिरजादे (दोघे रा. पिरजादे वाडा मेहरुण – जळगाव) यांना तातडीने गुन्हे शोध पथकातील कर्मचारी वर्गाने ताब्यात घेतले. अटकेतील दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. स्वाती निकम  यांनी  कामकाज  पाहिले. अटकेतील आरोपींना  5  मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली  आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here