नवी दिल्ली : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला पुरक खतपाणी घालणारी भाषण केल्याप्रकरणी काही दिवसांपुर्वी हनी बाबू नामक प्राध्यापकास अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सदर कारवाई केली होती. हनी बाबू मुसलियारविट्टील असे या अटकेतील प्राध्यापकाचे नाव आहे. हनी बाबू हा दिल्ली विद्यापीठात इंग्रजीचा प्राध्यापक आहे. NIA च्या अधिकाऱ्यांनी आता आरोपी हनी बाबू याच्या नोएडा स्थित घरावर छापा टाकला आहे. त्याच्या घरातून कॉम्प्युटर हार्ड-डिस्क, पेन ड्राईव्ह आणि काही साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.
हनी बाबू मुसलियारविट्टील यांच्यावर नक्षली कारवायांना मदत केल्याचा आरोप आहे. भीमा कोरेगांव प्रकरणी कट रचल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) चौकशीअंती त्याला अटक केली आहे. देशात बंदी असलेल्या CPI (माओवादी) या संघटनेचा हा प्राध्यापक पदाधिकारी असल्याचे समजते.
पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्याच्या पटांगणात एल्गार परिषद झाली होती. दलित अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या भीमा कोरेगांव येथील लढ्याच्या स्मरणार्थ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेनंतर लागलीच दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव दंगल झाली होती. या परिषदेमागे माओवाद्यांची संघटना असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार आरोपपत्र दाखल झाले. या एल्गार परिषद प्रकरणी तेलुगू साहित्यिक असलेले वरवरा राव देखील अटकेत आहेत.