पैठण : झाडावरुन पडलेली आंब्याची कैरी होमगार्डने खाण्यासाठी घेतली. ती कैरी का घेतली म्हणून सहायक पोलिस निरीक्षकाने आपल्याला खालच्या थराची शिवीगाळ केल्याची आरोपात्मक तक्रार संबंधीत होमगार्डने निवेदनाच्या माध्यमातून थेट उप विभागीय पोलिस अधिकारी, गृहमंत्री, होमगार्ड महासमादेशक, पोलिस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण यांच्याकडे केली आहे. याउलट होमगार्डची तक्रार खोटी असल्याचा खुलासा संबंधीत सहायक पोलिस निरीक्षकाने केला आहे. होमगार्ड मद्यपान करुन येतात आणि इतर लोक त्यांना भडकवतात असे सहायक पोलिस निरीक्षकांचे म्हणणे आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पैठण एमआयडीसी पोलिस स्टेशनला भागवत नागरगोजे हे सहायक पोलिस निरीक्षक म्हणून प्रभारी आहेत. याच पोलिस स्टेशनला विष्णू घोणे या होमगार्डची देखील नेमणूक आहे. 2 एप्रिल रोजी इद निमीत्त बंदोबस्तकामी विष्णू घोणे हा होमगार्ड पोलिस स्टेशनला ड्युटीवर हजर होता. दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिस स्टेशन आवारातील आंब्याच्या झाडाखाली विष्णू घोणे हा जेवण करण्यासाठी बसला. त्यावेळी झाडावरुन आंब्याची कैरी खाली पडली. ती कैरी खाण्यासाठी आपण उचलली असे घोणे याचे म्हणणे आहे. कैरी का उचलली? असे म्हणत सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी आपल्याला खडसावले. सर्व होमगार्डस् समक्ष आपल्याला खालच्या भाषेत शिवीगाळ करत आवारातून हाकलून दिले असा घोणे याचा आरोप आहे. पुन्हा इकडे दिसला तर तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याचा देखील घोणे याचा स.पो.नि. नागरगोजे यांच्याविरुद्ध आरोप आहे. सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे हे होमगार्ड यांना अत्यंत खालच्या भाषेत बोलून अपमानीत करतात अशा आशयाची तक्रार विष्णू लक्ष्मण घोणे या होमगार्डने (सनद क्र. 535) निवेदनाच्या माध्यमातून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. होमगार्डचे आरोप खोटे असल्याचे स.पो.नि. नागरगोजे यांनी म्हटले आहे.