जळगाव : सर्वांच्या मागे लागायचे, माझ्या मागे लागायचे नाही, सापडेल तेथे मारेन, माझ्यासारखी वाईट महिला कुणी नाही, जास्त चरबी चढली आहे……… वगैरे वगैरे स्वरुपातील भाषा एका रेशन दुकानदार महिलेने सामाजिक कार्यकर्त्यासोबत फोनवर केली. त्यानंतर काही वेळातच चमत्कार झाला. भाऊ झाले गेले विसरुन जावे. मी देखील सामाजिक कार्य करते. पक्षाचे सोडा, माझ्या बोलण्याकडेही लक्ष देवू नका. मला माफ करावे. संबंधीत महिलेचा सुरुवातीचा आक्रमक सुर सौम्य भाषेत परिवर्तीत होण्यास वेळ लागला नाही. जळगाव येथील माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या बाबतीत हा प्रकार 6 मे रोजी घडला. रेशन दुकान चालवणा-या एका पक्षाच्या कार्यकर्त्या महिलेने गुप्ता यांच्यासोबत हा शब्दप्रयोग केला होता.
रेशनवरील हक्काचे धान्य काही महिन्यापासून मिळत नसल्याची तक्रार एका लाभार्थी महिलेने सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्याकडे फोनवर केली. संबंधीत परवानाधारक महिला रेशन दुकानदाराकडे जावून त्यांच्यासोबत माझे फोनवर बोलणे करुन द्यावे असे गुप्ता यांनी तक्रारदार महिलेस फोनवर कथन केले. त्यानुसार सदर तक्रारदार महिलेने रेशन दुकानदार महिलेकडे गुप्ता यांच्यासोबत बोलण्यासाठी फोन दिला. फोन हाती घेतल्यानंतर काही क्षणातच रेशन दुकानदार महिलेचा आवाज चढला. माझ्यासारखी वाईट महिला कुणी नाही. सर्वांच्या नादी लागायचे, माझ्या नादी लागायचे नाही. रेशन दुकानदारांच्या मागे हात धुवून का लागले आहे असा प्रश्न पलीकडून रेशन दुकानदार महिलेने गुप्ता यांना केला.
त्यावर गुप्ता यांनी सौम्य शब्दात सांगितले की माझ्याकडे कुणी तक्रार घेऊन आल्यास त्याच्या तक्रारीचे मी निवारण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र राजकीय पक्षाचे काम करणारी रेशन दुकानदार महिला ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हती. त्यानंतर काही वेळाने गुप्ता यांनी आपली कायदेशीर लढाई सुरु केली. त्यानंतर काही वेळातच पलीकडून सदर रेशन दुकानदार महिलेचा गुप्ता यांना फोन आला. भाऊ झाले गेले विसरुन जा. मी देखील एक कार्यकर्ता आहे. मात्र गुप्ता यांनी तत्पुर्वीच पोलिस स्टेशनला सदर महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली होती.