जळगाव : जळगाव महानगर पालिकेच्या सतराव्या मजल्यावर भोंगा बसवण्यात आला आहे. हा भोंगा पुर्वी जुन्या नगरपालिकेच्या आवारात फुले मार्केटसमोर मोकळ्या जागेत जमीनीवर स्वतंत्र पिलरवर बसवला होता. कालांतराने नगरपालिकेचे महानगर पालिकेत रुपांतर झाले आणि मनपाचा कारभार सतरा मजली इमारतीमधून सुरु झाला.
हा भोंगा पुर्वी सकाळी पाच, दुपारी बारा आणी रात्री साडे आठ वाजता वाजवला जात होता. आता हा भोंगा दुपारी व रात्री अशा दोन वेळा वाजवला जातो. हा भोंगा वाजत असतांना त्याच्या आवाजाच्या हाद-यामुळे वेळोवेळी प्लॅस्टर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या भोंग्याच्या आवाज आणि हाद-यामुळे मनपाच्या सतरा मजली इमारतीचे आयुष्यमान घटत असल्याचे म्हटले जात आहे. मनपा इमारतीवरील हा भोंगा अन्यत्र बसवावा अशी मागणी रामनाथ सोनवणे आयुक्त असतांना व त्यापुर्वी देखील झाली होती. हा भोंगा इतरत्र स्थलांतरीत केला जाईल असे तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी त्यावेळी म्हटले होते. मात्र ते पदावर असेपर्यंत काहीच कारवाई झाली नाही. कालांतराने या विषयाची तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांना देखील विसर पडला होता.
त्यानंतर स्थायी समितीच्या एका बैठकीत देखील भोंग्याच्या स्थलांतराचा मुद्दा चर्चेत घेण्यात आला होता. असे अनेक मुद्दे आहेत की ते चर्चेत घेतले जातात आणि नंतर त्यावर अंमलबजावणीच होत नाही. हळू हळू तो मुद्दा जनतेसह अधिकारी वर्गाच्या स्मृतीपटलावरुन नाहीसा होत जातो. साधारण दशकापुर्वी हा भोंगा शास्त्री टॉवरवर स्थलांतरीत करण्याचा देखील मुद्दा चर्चेत आला होता. मात्र असे केल्याने टॉवरचे आयुष्य घटेल व असे करणे शास्त्रीत्य दृष्ट्या अव्यवहार्य असल्याचे मनपाच्या अभियंता वर्गातून म्हटले गेले होते. सतरा मजली इमारत उभी राहताच त्यावर भोंगा बसवण्यात आला होता. या भोंग्याच्या आवाजासह कंपनामुळे अनेकदा प्लॅस्टर पडण्याच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत.