नगर : क्षमतेपेक्षा अधिक कैदी झाल्यामुळे प्रत्येकी दहा प्रमाणे एकुण विस कैद्यांची रवानगी पारनेर उपकारागृहातून नाशिक आणि औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या विस कैद्यांमधे रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याचा समावेश आहे. बाळ बोठे यास नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे.
पारनेर उपकारागृहात एकुण 24 कैदी ठेवण्याची क्षमता आहे. असे असले तरी या ठिकाणी सत्तर कैदी ठेवण्यात आले होते.
प्रमाणापेक्षा अधिक कैदी संख्या झाल्यामुळे जुन्या गुन्ह्यातील कैदी अन्यत्र रवाना करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात दहा आणि नाशिक मध्यवर्ती कारागृहात दहा अशा एकुण विस कैद्यांची रवानगी करण्यात आली. रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बाळ बोठे कारागृहात असून त्याच्याविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन नामंजूर केला आहे. याशिवाय कोतवाली पोलिस स्टेशनला दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात देखील त्याला उच्च न्यायालयाकडून जामीन नामंजूर करण्यात आला आहे.