जळगाव : विनयभंग आणि अश्लिल शिवीगाळ करत महिलेच्या घरातील किमती सामानाची तोडफोड करणा-या चौघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रिम कॉलनी परिसरात राहणा-या महिलेकडे 9 मे रोजी परिसरात राहणारा नरेंद्र गुलाब मराठे हा आला होता. त्यावेळी त्याच्याकडे राहिलेल्या पैशांची मागणी महिलेने केली होती. पैसे मागितल्याचा राग आल्याने नरेंद्र मराठे याने तुझे कसले पैसे असे म्हणत महिलेला अश्लिल शिवीगाळ केली होती. त्यानंतर काही वेळातच गुलाबचा भाऊ विजय मराठे, आकाश जाधव, शंकर खर्चे असे सर्वजण त्याठिकाणी महिलेच्या घरात आले. विजय मराठे व आकाश जाधव यांनी आपल्यासोबत अशोभनीय कृत्य केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
दरम्यान बचावासाठी महिलेने पातेले उचलून आकाश जाधव यास मारुन फेकले होते. यावेळी गुलाब मराठे आणि शंकर खर्चे या दोघांनी महिलेच्या आईसह तिच्या मामाला मारहाण केली. घरातील टीव्ही, फ्रिज तसेच घराबाहेर लावलेली दुचाकीचे नुकसान केले. या घटनेप्रकरणी गुलाब मराठे, विजय मराठे, आकाश जाधव आणि शंकर खर्चे अशा चौघांना अटक करण्यात आली आहे.
विजय मराठे याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला मुंबई जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे दोन गुन्हे दाखल आहेत. आकाश जाधव याच्याविरुद्ध मुंबई पोलिस कायदा 122 नुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. शंकर खर्चे याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला भा.द.वि.283 नुसार एक आणि 143, 294, 336, 506 नुसार एक असे एकुण दोन गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.नि.प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चौघा आरोपींना पोलिस उप निरीक्षक दीपक जगदाळे, हे.कॉ. संजय धनगर, सतीश गर्जे, किरण पाटील आदींनी अटक केली. आज चौघांंना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश दिले. पुढील तपास सुरु आहे.