जळगाव : बड्या कंपनीत व्यवस्थापक असल्याची बतावणी करत हॉटेलमध्ये मुक्कामी राहून हॉटेल मालकाचे लाखो रुपयांचे राहण्याचे, जेवणाचे आणि मद्याचे बिल थकवून पलायन करणा-या भामट्यास अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मयुर अशोक जाधव, रा. प्लॅट नं. 04, श्रीगणेश आर्किड, गंगापुर रोड, रामेश्वर नगर, आनंदवल्ली, नाशिक असे त्याचे नाव आहे.
दिनांक 14/02/2022 ते 16/04/2022 या कालावधीत मयुर अशोक जाधव याने जळगाव शहरातील हॉटेल महेंद्रामध्ये मुक्काम केला. या कालावधीत त्याने हॉटेलमधील रेस्टॉरंट व बिअरबारमध्ये दारु पिणे, जेवण करणे असा कार्यक्रम केला त्यानंतर हॉटेलची रुम सोडून पळून गेला. त्याच्या नावे 1,89,590 रुपये बाकी होते. हॉटेल महींद्राचे मालक तेजेंद्रसिंग अमितसिंग महींद्रा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपासात आरोपी हा मुंबई येथे असल्याची माहीती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्याचा शोध घेण्याकामी पो.ना. इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, गोविंदा पाटील यांचे तपास पथक मुंबई येथे रवाना झाले होते. त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याचाकडे बाकी असलेल्या बिलाची एकुण रक्कम 1 लाख 89 हजार 950 रुपये त्याने दिली असून त्यास न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगीचे आदेश देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, गोविंदा पाटील, सचिन पाटील, म.पो.ना. निलोफर सैय्यद यांनी कारवाईत सहभाग घेतला. तपास पथकातील अंमलदार यांनी सलग तीन दिवस मुंबई येथे सापळा रचुन गुन्हयातील आरोपी मयुर अशोक जाधव यास अटक केली