औरंगाबाद : गुटखा विक्रेत्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी सुरुवातीला 25 हजार रुपयांची लाच मागणी प्रकरणी दौलताबाद पोलिस स्टेशनच्या महिला पीआय सुनिता मिसाळ यांचा सहभाग आढळून आला आहे. तडजोडीअंती 12 हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम स्विकारताच हस्तक पोलिस नाईक रणजीत सुखदेव शिरसाठ (53) यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी करण्यात आलेल्या या कारवाईने खळबळ माजली आहे.
दौलताबाद परिसरात गुटखा विक्रीचा व्यवसाय करणा-या विक्रेत्याकडे पीआय सुनिता मिसाळ यांच्या सांगण्यावरुन पोलिस नाईक रणजीत शिरसाठ याने लाचेची मागणी केली होती. पीआय सुनिता मिसाळ सध्या रजेवर आहेत. तडजोडी अंती त्यांनी गुटखा विक्रेत्याकडे दहा हजार रुपयांचा हप्ता मागीतला होता. पोलिस नाईक शिरसाठ याने त्याचे दोन हजार वेगळे असे एकुण बारा हजार मागीतले होते. अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित, निरीक्षक एन. एच. क्षीरसागर, राजेंद्र जोशी, प्रकाश घुगरे, चांगदेव बागूल, आशा कुंटे आदींनी सापळा रचून शिरसाठला रंगेहाथ पकडले. पीआय सुनिता मिसाळ रजेवर असल्याने त्यांना पकडण्यात आले नाही. मात्र, त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे सांगण्यात येत आहे.