धुळे : धुळे तालुक्यातील तरवाडे या गावी झालेल्या मायलेकींच्या हत्येमागे चारित्र्य हा घटक कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. हितेश गुणवंत महाले (22) या संशयीत आरोपी असलेल्या मुलाला धुळे एलसीबी पथकाने काल जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील आडगाव येथून ताब्यात घेतले आहे. संशयीताची आई वंदना आणि आजी चंद्रभागा अशी हत्या झालेल्या मायलेकींची नावे आहेत.
हितेशची आई वंदना ही गेल्या तिन महिन्यापासून सासरी आडगाव येथे न राहता माहेरी धुळे तालुक्यातील तरवाडे येथे रहात होती. तिची वर्तणूक बघता तिचा परिवार तिच्यापासून त्रस्त होता असे म्हटले जात आहे. वंदनाच्या वर्तणूकीला तिची आई व हितेशची आजी चंद्रभागाबाई हिचे पाठबळ असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे संतापाच्या भरात हितेशने लोखडी पाईपाने दोघा मायलेकींना ठार केल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याचे म्हटले आहे. वंदना हिने सासरी आडगाव येथे राहण्यास यावे असे तिचा पती गुणवंत महाले व दोघा मुलांचे म्हणणे होते. मात्र वंदना सासरी येण्यास तयार नव्हती. घटना घडल्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा धुळे एलसीबी पथकाने लावला.