जळगाव : देशी दारुचे गोडाऊन फोडून त्यातील 2 लाख 15 हजार 510 रुपयांची रोकड चोरणा-या त्रिकुटास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अमन उर्फ खेकडा रशिद सैय्यद (20), शेबी खान चाँद खान (19) दोघे रा. अजीम किराणाजवळ, सुप्रिम कॉलनी, जळगाव आणि उमेश उर्फ भावड्या संतोष पाटील (19) रा. रामदेव बाबा किराणाजवळ, सुप्रिम कॉलनी, जळगाव अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.
सुप्रीम कॉलनीत भुपेश कुलकर्णी हाताळत असलेल्या देशी दारु दुकानाच्या गोडाऊनमधे दिनांक 25 व 26 मार्च दरम्यान रोख रकमेची चोरी झाली होती. या घटनेत 2 लाख 15 हजार 510 रुपयांची रोकड चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद याने त्याचे साथीदार उमेश उर्फ भावड्या संतोष पाटील व शेबी खान यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील पो.ना. इम्रान सैय्यद यांना समजली.
ऐपत नसतांना तिघे जण मौजमजा करुन महागडया वस्तुची खरेदी करत असल्याने तिघांवर गुन्हे शोध पथकाला संशय आला. त्यांना शिताफीने ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी अमन उर्फ खेकडा रशिद सैय्यद या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराविरुद्ध यापुर्वी चोरीचे दहा गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. इम्रानअली सैय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील, सतिष गर्जे, म.पो.ना. निलोफर सैय्यद आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील करत आहेत.