बीड : मध्यरात्री ते पहाटे दरम्यान महामार्गावर वाहनाचा जॅक ठेवून ट्र्क चालकांना मोहात पाडायचे. जॅक उचलण्यासाठी वाहन थांबवून चालक खाली उतरताच शस्त्राचा धाक दाखवत त्याला मारहाण करायची. अशी गुन्हा करण्याची पद्धत वापरुन दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या दरोडखोरांच्या टोळीला बीड एलसीबी पथकाने जेरबंद केले आहे. केज तालुक्यात अशा स्वरुपाच्या दोन घटना घडल्या असून या दोन्ही घटनेतील गुन्ह्याची कबुली अटकेतील आरोपींनी दिली आहे.
सचिन शिवाजी काळे (24) रा. पारा ता.वाशी, पापा ऊर्फ काळ्या ऊर्फ आकाश बापू शिंदे (22) रा. खोमनवाडी शिवार, ता.केज, रामा लाला शिंदे (23), दादा सरदार शिंदे (45), दोघे रा. नांदूरघाट, ता. केज आणि विकास ऊर्फ बाबा ज्ञानोबा पवार (22), रा. चिंचोली माळी गायरान, ता.केज अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्ह्यात चोरलेले मोबाइल आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत.
बीड पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, उपनिरीक्षक संजय तुपे यांच्यासह पोलिस हवालदार मोहन क्षीरसागर, कैलास ठोंबरे, नसीर शेख, अलिम शेख, युनूस बागवान, पो.ना.अशोक दुबाले, गणेश हंगे, प्रसाद कदम, अलीम शेख, विकी सुरवसे, चालक गणेश मराडे, मुकुंद सुस्कर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.