जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): सागर, सुमित आणि अनिकेत हे तिघे एकाच परिसरात राहणारे एकमेकांचे मित्र होते. सागर हा रंगकाम करत होता. सुमित हा कापड दुकानावर तर अनिकेत हा बांधकामावर कामाला जात होता. अशा प्रकारे मोलमजुरी करणा-या तिघा मित्रांनी आपआपला अर्थार्जनाचा मार्ग निवडला होता. तिघे मित्र टीन एजर अर्थात विशीच्या आतील कुमारवयीन मित्र होते. अठरा वर्षाच्या वयोगटातील तिघा मित्रांना मिसरुढ देखील व्यवस्थित फुटलेली नव्हती, मात्र मद्यपानाची सवय त्यांना अल्पवयातच जडली होती. संगतीचा आणि आजुबाजूच्या वातवरणाचा तो परिणाम होता. तिघे मित्र जळगाव शहरातील दुध फेडरेशन नजीक असलेल्या राजमालती नगरातील रहिवासी होते.
अतिक्रमण करुन बांधलेल्या घरात सुमीतचे काही वर्ष वास्तव्य होते. अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई झाल्यामुळे ते घर सोडून सुमीत आपल्या आई वडीलांसह हुडको परिसरात राहण्यास गेला. अनिकेतचे वडील गणेश गायकवाड हे रेल्वेच्या मालधक्क्यावर हमालीचे काम करत होते. एकंदरीत तिघांच्या परिवारात शिक्षण आणि संस्कृतीचा अभाव, बुद्धीला योग्य ती चालना न देणारे कुपोषित वातावरण तिघा मित्रांच्या कुसंगतीला आणि मद्यपानाला पुरक ठरले होते.
दोन वर्षापुर्वी एका कुमारिकेसोबत सागरची ओळख झाली. आज अठरा वर्ष वयाचा सागर त्यावेळी सोळा वर्षाचा होता. ती कुमारिका देखील त्याच्यासारखीच अल्लड बुद्धीची अल्पवयीन होती. जगाचा शुन्य अनुभव असलेल्या सागरच्या नजरेत ती कुमारीका त्याच्यासाठी अप्सरा होती. तारुण्याच्या उंबरठयावर अर्थात सीमेवर उभी असल्यामुळे साहजीकच तीचा बांधा कमनीय होता. सागरच्या मते बॉलीवूडची नायिका देखील तिच्यासमोर कुठेच लागत नव्हती. अल्पवयीन सागरला ती अल्पवयीन मुलगी भलतीच आवडली. या अल्पवयात तरुणाईच्या वाटेवर आणि वळणावर असलेल्या तरुण तरुणींना केवळ बाह्य शारिरिक ग्लॅमर हवेहवेसे वाटत असते. ती मुलगी त्याच्यासाठी जणू सौंदर्याचा खजीना होती. तिच्या स्मित हास्याची झलक बघताच सागरच्या काळजाचे पाणी पाणी होत असे. आपल्यावर कुणीतरी मरत असल्याची अर्थात जीव ओवाळून टाकत असल्याची त्या मुलीला जाणीव झाली. आपण वयात आलो आहोत व आपल्या रुपावर सागर भान विसरुन बेभान झाला असल्याचे तिने ओळखले. ती देखील सागरला कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद देवू लागली. दोघे जण अधुनमधून चोरुन लपून एकांतात भेटत होते. या अल्पवयात दोघे एकमेकांना स्पर्श करत होते. रंगकामातून आलेली कमाई तो त्या मुलीवर उधळत होता.
एके दिवशी दोघांचे प्रेमसंबंध अनिकेतला समजले. अनिकेतला हा प्रकार समजल्यानंतर सागरच्या प्रेमाची गाडी रुळावरुन घसरली. त्याला कारणही तसेच होते. अनिकेतने हा प्रकार त्या मुलीच्या भावाच्या कानावर टाकला होता. सागर आपल्या बहिणीवर प्रेम करत असल्याचे समजताच तिचा भाऊ सागरवर सागरी लाटेप्रमाणे खवळला. त्या मुलीच्या घरात देखील जणूकाही भुकंप झाला. त्या मुलीच्या भावाच्या मुखातून ज्वालामुखीचा जणूकाही उगम झाला.
त्या मुलीच्या अवतीभोवती कडा आणि खडा पहारा लागला. एकुणच सागर आणि ती मुलगी यांच्यात जे काही तोडकेमोडके प्रेम जमले होते ते देखील अनिकेतमुळे संपुष्टात आले. त्यामुळे सागर जणूकाही वेडापिसा झाला. टीन एजर सागरसाठी ती मुलगी म्हणजे जणूकाही स्वर्गातील रंभा, उर्वशी आणि मेणका समान होती. आता अनिकेतला बघावेच लागेल असा कुविचार त्याच्या मनात घोळू लागला. त्यासाठी तो संधीची वाट बघू लागला. त्या दृष्टीने तो कामाला लागला. या कामासाठी सागरने सुमीतला तयार केले. त्या मुलीसोबत असलेले प्रेमसंबंध केवळ अनिकेतमुळे संपुष्टात आले असून त्याला ठार करायचे आहे व त्यासाठी मला तुझी मदत हवी असे सागरने सुमितला कथन केले. मैत्री निभावण्यासाठी सागरच्या कटात सामील होण्यासाठी सुमीत तयार झाला. अनिकेतला ठार करण्यासाठी सुमितने भुसावळ येथून गुपचूप एक चॉपर विकत आणून ठेवला.
24 मे 2022 चा दिवस उजाडला. या दिवशी रात्री दहा वाजता सागरने सुमितची भेट घेतली. आज रात्री अनिकेतला मारायचे आहे असे सागरने सुमितला म्हटले. त्याच्या बोलण्याला सुमितने दुजोरा दिला. त्यानंतर दोघेही मोटारसायकलने अगोदर सुमितच्या घरी गेले. सुमितने त्याच्या घरुन चॉपर सोबत घेतला. तो चॉपर सोबत घेतल्यानंतर दोघे जण पुन्हा राजमालती नगर परिसरात आले. त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते. त्यावेळी अनिकेत एका ओट्यावरच बसलेला होता. ओट्यावर बसलेल्या अनिकेतजवळ दोघेही आले. “चल आपण दारु पिण्यास जावू” असे दोघे जण त्याला म्हणाले. फुकटची दारु पिण्यास मिळत असल्याचे बघून अनिकेत लागलीच तयार झाला. एकाच मोटारसायकलीवर तिघे ट्रिपल सिट बसले. भजे गल्लीतील एका दुकानातून त्यांनी दारुची बाटली विकत घेतली. घेतलेली दारु पिण्यासाठी तिघे जण सुरत रेल्वे लाईनवरील मालधक्क्याजवळ आले. त्यावेळी रात्रीचे बारा वाजले होते. एका ट्रकच्या आडोशाला तिघे जण दारु पिण्यास बसले.
हळूहळू तिघांवर मद्याचा अंमल चढू लागला. आता सागरने त्या मुलीचा विषय अनिकेतजवळ छेडला. तु तिच्या भावाला आमच्या प्रेमसंबंधाबद्दल का सांगितले असे सागर बरळला. त्या मुलीच्या विषयावरुन सागर आणि अनिकेत यांच्यात शाब्दीक बाचाबाची सुरु झाली. सागरच्या बोलण्याला सुमित दुजोरा देत समर्थन करत होता. मद्याची झिंग चढल्यामुळे सागरने सुमीतजवळ असलेला चॉपर आपल्या कब्जात घेतला. सागरने अनिकेतच्या पाठीवर, डोक्यावर, मांडीवर आणि हाताच्या कोप-यावर चॉपरचे सपासप वार केले. आपल्या जीवाचे आता नक्कीच बरे वाईट होणार असून जीव वाचवणे आपले आद्यकर्तव्य असल्याचे अनिकेतच्या लक्षात आले. तो आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. तो पळू लागताच सागरने जवळच पडलेला एक दगड त्याच्या पायावर फेकून मारला. दगड पायावर लागल्यामुळे साहजीकच अनिकेतची धाव क्षणार्धात थांबली व तो धाडकन जमीनीवर कोसळला. अनिकेत पालथा पडताच सागर आणि सुमित या दोघांनी मिळून त्याच्या डोक्यात दगड टाकला. अगोदर चॉपरचे ठिकठिकाणी वार, त्यानंतर दगडाचा पायावर आणि थेट डोक्यात वार झाल्यामुळे अनिकेत जागीच गत:प्राण झाला. एवढ्या रात्री या सुनसान जागी त्याच्या मदतीला कुणीही नव्हते. अनिकेत ठार झाल्याचे लक्षात येताच सागर आणि सुमित या दोघांनी तेथून पलायन करत मेहरुण तलाव गाठला.
तरुणाचा खून झाल्याची माहिती परिसरात काही लोकांना समजली. कुणीतरी जळगाव शहर पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ठाणे अंमलदाराने पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांना माहिती दिली. पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर हा प्रकार टाकला. काही वेळातच पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक अरुण सोनार, पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, हे.कॉ. विजय निकुंभ, हे.कॉ. सुनिल बडगुजर, भास्कर ठाकरे, पो.कॉ. रतन गिते, कमलेश पाटील, तेजस मराठे याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार रवी नरवाडे, युनुस शेख इब्राहीम, हे.कॉ. संजय नारायण हिवरकर, राजेश बाबाराव मेंढे, सुनिल दामोदरे, पोना संतोष मायकल, नंदलाल दशरथ पाटील, भगवान तुकाराम पाटील, किरण मोहन धनगर, प्रमोद अरुण लाडवंजारी, किरण चौधरी, रमेश भरत जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अनिकेत हा पोलिसांसाठी अनोळखी होता. त्याची ओळख पटवण्यासह त्याचे मारेकरी निष्पन्न करणे देखील तेवढेच महत्वाहे होते. रात्र बरीच झालेली होती. त्यामुळे तपास देखील तेवढाच अवघड झाला होता. घटनास्थळावर दगड, मद्याची बाटली व ग्लास पडलेले होते. पोलिस पथकाने मृतदेहासह घटनास्थळाचा पंचनामा पुर्ण केला. दरम्यान मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम देखील तेवढ्याच तत्परतेने सुरु होते. या कालावधीत नजीकच्या राजमालती नगरात या घटनेची माहिती काही नागरिकांना समजली. राजमालती नगर परिसरात राहणारे अर्जुन धोबी यांनी घटनास्थळावरील मृतदेहास ओळखले. मयत तरुण हा अनिकेत गणेश गायकवाड असल्याचे त्यांनी उपस्थित पोलिस अधिका-यांना कथन केले. एक महत्वाचा धागा आणि माहिती अर्जुन धोबी यांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाल्याने पोलिस तपासाची चक्रे गतीमान झाली.
अर्जुन धोबी यांना सोबत घेत पोलिसांनी मयत अनिकेतचे घर गाठले. घरी हजर असलेले त्याचे वडील गणेश गायकवाड व त्यांचा मुलगा विशाल या दोघांना पोलिसांनी सोबत घेत घटनास्थळावर मृतदेहाची ओळख पटवण्याकामी आणले. घटनास्थळावरील मयत तरुणाच्या डोक्याचा भाग पुर्णपणे चेंदामेंदा झालेला होता. त्यामुळे चेहरा ओळखता येत नव्हता. मात्र त्याच्या अंगावरील कपडे, हातातील कडे तसेच पायातील काळा दोरा यावरुन तो आपला मुलगा अनिकेत असल्याचे गणेश गायकवाड यांनी ओळखले. आपल्या मुलाची ही दुर्दशा बघून घटनास्थळावर आलेल्या दोघा बाप बेट्यांनी एकच हंबरडा फोडला. आपल्या मुलाला कुणी मारले असा एकच आक्रोश रात्रीच्या वेळी आसमंतात घुमला. अशा प्रकराचे भावनिक चित्र नजरेसमोर असले तरी पोलिसांनी आपले कर्तव्य बजावण्याचे काम सुरु ठेवले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तो तातडीने शव विच्छेदनकामी सामान्य रुग्णालयात रवाना करण्याची तयारी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या एका फळीतील पथकाने गणेश गायकवाड यांना सोबत घेत पोलिस स्टेशनला आणले. त्यांच्याकडून फिर्याद घेण्यात आली. गणेश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध अनिकेत याच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.नं. 131/2022 भा.द.वि. कलम 302 नुसार दाखल करण्यात आला.
दरम्यान एलसीबीचे पथक मारेक-यांच्या शोधकार्यात गुंतले होते. अनिकेतची कुणाशी मैत्री व कुणाशी वैर होते याची माहिती काढण्याचे काम सुरु करण्यात आले. मयत अनिकेत रात्री शेवटचा कुणाकुणाला भेटला होता. तो कुणाकुणाच्या संपर्कात आला होता या बाबतची माहिती संकलीत करण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या सहका-यांनी समांतर पातळीवर सुरु केले. घटनेच्या रात्री मयत अनिकेतसोबत त्याचे मित्र सागर समुद्रे व सुमीत शेजवळ हे असल्याची माहिती एका खब-याकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजली.
माहिती मिळताच पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक अरुण सोनार, पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे तसेच सहायक फौजदार रवी नरवाडे, हे.कॉ. संजय हिवरकर, विजय निकुंभ, संतोष मायकल, प्रमोद वंजारी, राजेंद्र मेंढे, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, गजानन बडगुजर, राजकुमार चव्हाण, कमलेश पाटील, प्रणेश ठाकूर, रतन गिते यांच्या पथकाने रात्रीतूनच सागरचे घर गाठले. दरम्यान घटनास्थळावरुन पलायन केलेल्या दोघा मारेक-यांनी मेहरुण तलावावर आगमन केले होते. यातील सागरने त्याचे वडील बाळू समुद्रे यांना रात्रीच मोबाईलवर संपर्क साधून केलेल्या गुन्ह्याची माहिती दिली होती. त्यामुळे त्याचे वडील बाळू समुद्रे यांना घटनेची व गुन्ह्याची माहिती होती. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी बाळू समुद्रे याच्या घरी आगमन केले. एवढ्या रात्री पोलिसांचे पथक आपल्या घरी आल्याचे बघून त्यांना सर्व काही समजले होते.
पोलिसांनी आपल्या खाक्या आणि धाक दाखवून त्यांच्याकडून सागरच्या गुन्ह्याची माहिती वदवून घेत खात्री करुन घेतली. त्यानंतर पोलिसांनी सागरच्या वडीलांना त्यांचा मुलगा सागर यास फोन करण्यास सांगितले. त्यांच्या मोबाईलचा स्पिकर ऑन करुन तु आता कुठे आहेस? आणि आहे तेथेच थांब असे विचारण्यास आणि कथन करण्यास लावले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सागर यास फोन लावला. तु आता कुठे आहेस? असा प्रश्न बाळू समुद्रे यांनी सागर यास मोबाईलवर विचारला. त्यावर मी आता मेहरुण तलावावर आहे? असे उत्तर मिळाले. त्यानंतर तु तेथेच थांब असे त्यांनी त्याला सांगितले. त्यानंतर काही वेळातच स्थानिक गुन्हे शाखेसह शहर पोलिस स्टेशनचे पोलिस पथक वायुवेगाने मेहरुण तलाव ट्रॅकवर दाखल झाले. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करुन सागर बाळु समुद्रे आणि सुमीत संजय शेजवळ या दोघांना ताब्यात घेत अटक केली. दोघांनी आपला गुन्हा कबुल केला.
या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शन अधिकारी व कर्मचारी वर्गाला लाभले. रात्रीच्या वेळी घटना घडली असतांना देखील खबरी, तांत्रीक मदत आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन या आधारे या गुन्ह्याचा तपास काही तासातच लावण्यात यश आले. या गुन्ह्याचा पुढील तपास जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे व त्यांचे सहकारी सुनिल बडगुजर करत आहेत.