वृद्ध दुचाकीधारकाचे दागिने दोघांनी केले लंपास

On: May 31, 2022 11:06 PM

जळगाव : मोटार सायकलने शेतात जाणा-या वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचा-याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि अंगठी असा एकुण 42 ग्रॅम वजनाचा ऐवज दोघा भामट्यांनी शिताफीने गायब केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी वृद्धाने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शामराव लोटू तायडे (80) असे या घटनेतील लुबाडण्यात आलेले वृद्ध आहेत.

शामराव तायडे हे एमआयडीसी भागात वायरमन ऑपरेटर पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. शेताची पाहणी करण्यासाठी ते नेहमी जळगाव तालुक्यातील लोणवाडी भागात दुचाकीने जात असतात. 30 मे रोजी नेहमीप्रमाणे ते जळके – लोणवाडी दरम्यान त्यांच्या अ‍ॅक्टीवा दुचाकीने शेतात जात होते. त्यावेळी दोघांनी त्यांची वाट अडवली. साहेबांनी आमची ड्युटी येथे लावली असून तुमच्या गाडीत गांजा आहे का ते आम्हाला चेक करु द्या असे म्हणत दोघांनी तायडे यांच्यावर रुबाब दाखवला. गाडीची डिक्की तपासल्यानंतर दोघांनी त्यांना म्हटले की या ठिकाणी या ठिकाणी दोन दिवसापूर्वी एका जणाला चाकू दाखवत लुटण्यात आले होते. बाबा तुम्ही तुमच्याकडील अंगठी व चेन काढून आम्हाला द्या. आम्ही रुमालात ठेवून ती तुमच्या डिक्कीत ठेवून देतो. दरम्यान एकाने वृद्धास बोलण्यात गुंतवून ठेवले. या कालावधीत दुस-याने ऐवज गाडीच्या डिक्कीत ठेवण्याचा देखावा केला.
त्यानंतर काही अंतर पुढे गेल्यावर वाहनाची डिक्की तपासली असता त्यातील रुमालात काहीही नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघा अज्ञात इसमांविरुद्ध तायडे यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment